17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र२२ जानेवारीला कारसेवकांचे स्वप्न पूर्ण होतेय

२२ जानेवारीला कारसेवकांचे स्वप्न पूर्ण होतेय

मुंबई : २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे. त्यादिवशी कारसेवकांचे स्वप्न पूर्ण होतेय. कुणालाही त्रास न देता गावागावांत आरती, पूजा करा, असे राज ठाकरेंनी आपल्या पदाधिका-यांना सांगितले. ते पुण्यात मनसेच्या मेळाव्यात बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात आज मनसेचा मेळावा पार पडला. पुण्यातील गणेश कला मंदिरातील या मेळाव्यास मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, बाबू वागसकर, शिरीष सावंत हे नेते उपस्थित होते. या मेळाव्यास मनसेच्या महाराष्ट्रातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह जिल्हा अध्यक्ष आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधन केले. त्यावेळी त्यांनी गावात चांगले वातावरण करा. मत न देणा-यांचा सूड घेऊ नका… यासारखे सल्ले दिले.

गाव स्वच्छ ठेवा, परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही तर इच्छाशक्ती लागते. अनेक गावं फिरलो, तिथे स्वच्छतेची दुरवस्था दिसली. गावातील तरुण शहरात येतो अन् शहरातील तरुण विदेशात जातो. असं का होतं. कारण सभोवतालचं वातावरण चांगलं मिळत नाही. जगावं असं वातावरण मिळत नाही. विदेशात जाऊन प्रत्येकाला चांगली नोकरी मिळते असं नाही. गावातील चांगलं वातावरण तयार करणं, हे पहिलं ध्येय असायलं हवं.

त्यासाठी नव्या कल्पना सुचायला हव्यात.
तुमचं गाव, तुम्ही चांगलं, स्वच्छ ठेवा. गावातील वातावरण बदला, चांगलं करा.. गावातील माता-भगिनींना गावात राहावं असं वाटलं पाहिजे. मतदान केले नाही तरीही गावातील वातावरण चांगलं करा. तुम्हाला मतं पडतील, असा सल्ला मनसे पदाधिका-यांना राज ठाकरेंनी दिला. ज्यांनी मतं दिली नाहीत, त्यांचा सूड घेऊ नका, गाव स्वच्छ करा… मत दिले नाही त्यालाही तुम्हाला मत द्यावं वाटलं पाहिजे, असाही सल्ला राज ठाकरेंनी दिला. गावात असं काम करा की गावातील आधीच्या पिढीला हेवा वाटेल, असे राज ठाकरे म्हणाले.

स्वच्छ ग्रामपंचायतीला पाच लाखांची देणगी

गावातील नागरिकांची बैठक बोलवा, गाव स्वच्छ कसं ठेवायचं याबाबत चर्चा करा. मनसेच्या हातात असलेल्या सर्वांत जास्त स्वच्छ असणा-या ग्रामपंचायतीला पाच लाख रुपयांचा निधी देईन. ही रक्कम कमी वाटत असेल तर जास्त देईन, असेही राज ठाकरे म्हणाले.

२२ जानेवारीला कारसेवकांसाठी कार्यक्रम घ्या
२२ जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. राम मंदिर होणार आहे, त्यापेक्षा महत्त्वाचं ज्या कारसेवकांनी कष्ट घेतले, स्वप्न पाहिले, ते २२ तारखेला पूर्ण होतेय. त्या कारसेवकांसाठी म्हणून जिथे जिथे तुम्हाला चांगलं करता येईल.. लोकांना त्रास न देता जे काही करता येईल ते करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR