पॅरिस : भारताचा नेमबाज विजयवीर सिद्धूने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा १७ वा कोटा मिळवला आहे. आतापर्यंत ऑलिम्पिक इतिहासात भारताचे १७ नेमबाज कधीही सहभागी झाले नव्हते. विजयवीरने जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया ऑलिम्पिक क्वालिफायर पुरूष २५ मीटर रॅपिड फायर स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं आहे.
२१ वर्षाच्या विजयवीर सिद्धूने गेल्या वर्षी हांगझू येथे झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. त्याने आता अनिश भनवाला सोबत २५ मीटर रॅपिड फायर मध्ये ऑलिम्पिक कोटा जिंकला.
गेल्या वर्षी कोरिया येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत अनिशने कांस्य पदक जिंकत ऑलिम्पिक कोटा पटकावला होता. विजयवीरला ऑलिम्पिक कोटा मिळवण्यासाठी पदक जिंकण्याची गरज नव्हती. त्याचा फायनलसाठीच्या अंतिम चार खेळाडूंमध्ये समावेश झाल्यानंतर त्याने ऑलिम्पिक कोटा जिंकला. त्याने ५७७ गुणांसह अंतिम चारमध्ये स्थान पटकावले.
आज सहापैकी चार फायनलिस्ट थेट ऑलिम्पिक कोटा पटकावणार होते. छत्तीसगडच्या या शूटरने बाद फेरीत २८ राऊंड फायर करत रौप्य पदक जिंकले. तो कझाकिस्तानच्या निकिता चिरयूकिनने ३२ शॉट्सह सुवर्ण पदक पटकावलं.