सोलापूर : सोलापूर आणि महाराष्ट्रात आपल्या कर्तुत्वाने आपली सिध्दता दाखवली अशा गुणीजणांना सन्मान सोन्नलगी पुरस्काराच्या माध्यमातून चाकोते परिवाराकडून करण्यात आला याचा आनंद वाटतो असे प्रतिपादन सोलापूरचे सुपुत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. तळे हिप्परगा येथील शॉवर अॅन्ड टॉवर वॉटर पार्कमध्ये झालेल्या सोन्नलगी पुरस्काराचे वितरण सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या शानदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशीपीठाचे श्री श्री श्री 1008 जगदगुरू ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी होते.
आपल्या क्षेत्रात काम करताना समाजाला नवी दिशा देण्याचे काम करणाऱ्यांचा सन्मान करणे योग्यच आहे आणि सोलापूरमधील अशीच काही कर्तव्यतत्पर अधिकारी, पत्रकार, उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांना निवडून त्यांच्या कामाला प्रतिष्ठा देण्याच्या दृष्टीने चाकोते परिवाराने सोन्नलगी पुरस्कार देवून गौरव केला आहे. ही परंपरा चांगली आहे आणि त्याची जोपासना माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केली त्याचा आनंद आहे असेही सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. समाजात निस्वार्थ काम करून समाजाची सेवा करणाऱ्यांचा गौरव चाकोते परिवाराकडून करण्यात येतो, माजी आमदार बाबुराव चाकोते यांचा वारसा विश्वनाथ चाकोते आणि त्यांचे परिवाराने सुरू ठेवला आहे हे विशेष आहे. असे आर्शीवचन काशीपीठाचे जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी यांनी दिले.