नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज शॉन मार्शने आपल्या सुवर्ण क्रिकेट कारकीर्दीला अलविदा करण्याची घोषणा केली आहे. शनिवारी मेलबर्न स्टार्स विरुद्ध बिग बॅश लीग सामन्यात मेलबर्न रेनेगेड्ससाठी ६४ धावांची नाबाद इनिंग खेळल्यानंतर मार्शने याचा खुलासा केला. बुधवारी तो सिडनी थंडरविरुद्ध कारकीर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे.
४० वर्षीय मार्शने ऑस्ट्रेलियासाठी ३८ कसोटी, ७३ एकदिवसीय आणि १५ टी-२०आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्याने अनुक्रमे २२६५, २७७३ आणि २५५ धावा केल्या. जून २०१९ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३ शतके आणि २५ अर्धशतके केली आहेत. मार्शने वयाच्या १७ व्या वर्षी क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली.
२००८ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमात सर्वाधिक धावा करून मार्शने प्रसिद्धी मिळवली होती. किंग्ज इलेव्हन पंजाब (आताची पंजाब किंग्ज) कडून खेळताना त्याने पहिल्या सत्रात ११ सामन्यांत ६१६ धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती. यानंतर, त्याच वर्षी त्याने वेस्ट इंडिज दौ-यावर ऑस्ट्रेलियाकडून वनडे आणि टी-२० मध्ये पदार्पण केले. आयपीएलमध्ये तो २०१७ पर्यंत पंजाब संघासाठी खेळला. त्याने ७१ सामन्यांमध्ये ३९.९५ च्या सरासरीने २४७७ धावा केल्या, त्यात एक शतक आणि २० अर्धशतके झळकावली.