मुंबई : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन काल पार पडले. या रिसेप्शन सोहळ्याला अनेक कलाकारांनी तसेच विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. आयरा आणि नुपूरच्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील परशा आणि आर्ची म्हणजेच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांच्या एका व्हीडीओने अनेकांचे लक्ष वेधले आहे. या व्हीडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
‘सैराट’ या चित्रपटामधील आर्ची आणि परशा या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात आकाश ठोसरने परशा तर रिंकू राजगुरूने आर्ची ही भूमिका साकारली. ‘सैराट’ चित्रपटानंतर या दोघांना पुन्हा एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातच आकाश आणि रिंकू यांनी नुपूर आणि आयरा यांच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली. या दोघांनी एकत्र पापाराझीला फोटोसाठी पोज दिल्या. आयरा आणि नुपूरच्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्यातील रिंकू आणि आकाशच्या व्हीडीओवर अनेक नेटक-यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
आयरा आणि नुपूरच्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्यातील आकाश आणि रिंकूच्या व्हायरल झालेल्या व्हीडीओवर एका नेटक-याने कमेंट केली, ‘मला हे दोघे खूप आवडतात.’ तर दुसर-या युझरने कमेंट केली, ‘सैराट जोडी’
‘सैराट’ या सिनेमामुळे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर रातोरात सुपरस्टार झाले. हा चित्रपट २०१६ मध्ये रिलीज झाला पण आजही प्रेक्षक आवडीने हा चित्रपट बघतात. या चित्रपटामधील गाण्यांना आणि चित्रपटामधील रिंकू आणि आकाशच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काही महिन्यांपूर्वी आकाशचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट रिलीज झाला होता तर रिंकू ही ‘झिम्मा-२’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता प्रेक्षक रिंकू आणि आकाशच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.