मुंबई : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरु करण्यात आलीये. त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाची महिला आघाडी देखील प्रचाराच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्यांदाच रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्त्री शक्ती संवाद’ यात्रा आयोजित करण्यात आलीये. मंगळवार १६ जानेवारी रोजी विदर्भापासून या यात्रेची सुरुवात होणार आहे. यामध्ये विदर्भातील महिलांशी संवाद साधला जाईल.
पक्षाच्या उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी,राजूल पटेल, शितल देवरुखकर आणि रंजना नेवाळकर संपूर्ण विदर्भातील विधानसभेचा सखोल आढावा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गटाची स्त्रीशक्ती संवाद यात्रा विदर्भातून सुरू होणार आहे.
आंगणवाडी सेविकांशी संवाद साधला जाणार
राज्यात सध्या अंगणावाडी सेविकांचा प्रश्न हा प्रलंबित आहे. त्याच पार्श्वभूमीवर महिला आघाडीकडून महिला बचत गट, अंगणवाडी सेविका आणि इतर महिलांशी संवाद संबंधित विषयांवर भाष्य या संवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे अमरावती, यवतमाळ वाशिम, रामटेक लोकसभा मतदारसंघात या महिला आघाडीकडून दौरा केला जाईल.