मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवार १६ जानेवारी रोजी महा पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पत्रकार परिषद म्हणजे एक प्रकारे ‘जनता न्यायालय’ असेल. ‘सत्य ऐकून विचार करा!’ असं ठाकरे गटाकडून या पत्रकार परिषदेबद्दल सांगण्यात येतंय. ही पत्रकार परिषद नेमकी आयोजित करण्याची वेळ का आली आहे? या पत्रकार परिषद असे कोणते मोठे गौप्यस्फोट जाणार? पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे सोबत नेमकं कोण असणार? हे प्रश्न सध्या उपस्थित केले जातायत.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्या उद्धव ठाकरे महा पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्या दुपारी ४ वाजता वरळी डोम याठिकाणी एका मोठ्या सभागृहात ही पत्रकार परिषद पार पडेल. यामध्ये उद्धव ठाकरे काही महत्त्वाचे खुलासे विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर करतील अशी माहिती देण्यात आलीये. उद्धव ठाकरेंसोबत या पत्रकार परिषदेत कायदे तज्ञ सुद्धा बोलवण्यात आलेत.
त्यामुळे उद्याची पत्रकार परिषद ही एक प्रकारे जनता न्यायालय असेल असं शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेला कार्यकर्ता आणि सर्वसामान्य जनता देखील उपस्थित राहू शकणार आहे.
या पत्रकार परिषदेत नेमके काय होणार?
या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यत्व करुन विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मुद्दे उपस्थित करण्यात येतील. त्याचप्रमाणे २०१८ साली शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेल्या बदलाची माहिती पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून समोर ठेवली जाईल. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडे देखील या सगळ्याची प्रत पाठवण्यात आल्याचे पुरावे दिले जातील.