बीड : बीडमध्ये चार दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यावेळी एका जमावाने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे ऑफिस जाळले होते. तसेच आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर जाळले होते. क्षीरसागर कुटुंब हे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहेत. असे असताना त्यांच्या घर आणि कार्यालयावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली आणि याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. त्या दिवशी मनुष्यहानी झाली नाही अन्यथा बीडच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना घडली असती. हा हल्ला नियोजनबद्ध पद्धतीनेच करण्यात आला, असे ते म्हणाले.
जयदत्त क्षीरसागर बोलताना म्हणाले की, पोलिस तपास सुरु असून आत्ताच त्याच्यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही. या प्रकरणात कोण मास्टरमाईंड आहे, ते कळेलच. त्या दिवशी ऑफीस, गाडी, घराच्या समोर असलेल्या पाच ते सहा गाड्या जळण्यात आल्या. ऑफीसमध्ये तीन कर्मचारी होते. त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला. घरीसुद्धा सगळे कुटुंबिय घरात होते. एवढे सदस्य घरात असताना कोंडून मारण्याचा प्रयत्न आणि दगडफेक करण्यात आली. अशा प्रकारची घटना घडणं म्हणजे सामाजिक सुरक्षेलाच आव्हान देण्यासारखं आहे. आज कोण सुरक्षित आहे? अशा घटना घडत असतील आणि असे पायंडे पडत असतील तर आज कोण सुरक्षित आहे? तर मला वाटते की ही अतिशय चिंतनीय बाब आहे.