मुंबई : प्रतिनिधी
भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस विक्रमी ठरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स प्रथमच ७३ हजार अंकाच्या पुढे गेला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टी २२ हजार १०० अंकाच्या जवळ पोहोचला. सेन्सेक्स ७५० अंक अर्थात १.०५ टक्क्यांच्या तेजीसह ७३ हजार ३२८ अंकांवर बंद झाला तर निफ्टी ०.९३ टक्के अर्थात २०३ अंकांसह २२ हजार ०९७ अंकांवर बंद झाला.
दिवसभराच्या कामकाजात आयटी कंपनी विप्रोचा शेअर १४ टक्क्यांनी वधारला होता. बाजार बंद झाला तेव्हा तो ६ टक्के तेजीसह बंद झाला. याच बरोबर एचसीएल टेक, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, मारुती सुझुकी, हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, एसबीआय, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा आणि टीसीएस या कंपन्यांचे शेअर ०.६ ते ३ टक्के तेजीसह बंद झाले.
सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही त्यांच्या सार्वकालिक उच्चांकावर बंद झाले. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अवघ्या एका दिवसात ३ लाख कोटींची वाढ झाली तर गेल्या २ ट्रेडिंग दिवसांमध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. व्यवहारादरम्यान निफ्टीने २२,११५.५५ अंकांच्या तर सेन्सेक्सने ७३,४०२.१६ अंकांच्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. आयटी कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या निकालांनी बाजाराचा उत्साह वाढविण्यात मोठा हातभार लावला.