पुणे : पुणे विद्यापीठाबारे जोरदार राडा झाला. भाजप कार्यकर्ते आणि एसएफआय संघटना आमने-सामने आले आणि जोरदार भिडले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली. पुणे विद्यापीठात पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. हा मजकूर लिहिणा-यांवर कारवाई करावी यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि भाजपने विद्यापीठाबाहेर जोरदार आंदोलन केले. हे आंदोलन सुरू असताना एसएफआयचे कार्यकर्ते तिथे आले. दोन्ही संघटना आमने-सामने आल्यावर जोरदार घोषणाबाजी झाली, धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर पोलिसांनी एसएफआयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
विद्यापीठात गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थी संघटनांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यात आता विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक आठ मधील भिंतीवर पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भातील इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची घटना समोर आली, या घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील आंदोलन संपल्यावर भाजप आणि अभाविपचे कार्यकर्ते परत येत असताना मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. रिफेक्ट्रीसमोर एसएफआयची सदस्य नोंदणी करणारे कार्यकर्ते दिसल्यावर आंदोलक त्यांच्यावर धाऊन गेले. त्यांनी सदस्य नोंदणी रोखली.