शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
भारतात एकमेव उजेड या गावात भरणा-या यावर्षीच्या गांधी बाबा यात्रेचे स्वरूप व्यापक राहणार असून ही यात्रा विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. गांधीबाबा यात्रेबाबत दि.१५ जानेवारी रोजी रात्री घेण्यात आलेल्या यात्रा कमिटीच्या बैठकीत सकल्प करण्यात आला.
यात्रा कमिटीच्या संयोजकपदी पत्रकार शकील देशमुख यांची तर सहसंयोजकपदी म्हणून अनंत जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सर्व जगाला सत्य व अंिहसेचा मंत्र देणा-या महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रभावित होवून उजेडवासीय त्यांच्या विचारांना जोपासण्याचे काम करीत असून त्यांच्या विचारांचा जागर पुढे नेत नवीन पिढीला जगण्यासाठी दिशा मिळावी या हेतूने गांधी बाबाच्या नावाने दि. २३,२४,२५,२६,२७ जानेवारीला यात्रा भरविली जाते.
लातूर जिल्ह्यातील हिसामाबाद (उजेड) या गावी गेल्या ६७ वर्षांपासून अविरतपणे यात्रा भरवित असून यासाठी लागणारा निधी गावकरी वर्गणीच्या माध्यमातून गोळा करतात. यासाठी दर वर्षी मकर संक्रातीच्या रात्री यात्रा कमिटीची बैठक घेतली जाते. या बैठकीला गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रमासह शेतकरी मार्गदर्शन शिबीर, आरोग्य शिबीर, महिलांना आरोग्य मार्गदर्शन, संगीत, शालेय खेळ, पशु शिबिर, पशुप्रदर्शन, कुस्त्या असे अनेक उपक्रम राबविण्याचे ठरले आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या विषय समित्या बनविण्यात आल्या असून यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य कमिटी बनविण्यात आली आहे. आतापर्यंत या यात्रेला शासनाने मदत जाहीर केली नाही. किंवा नेत्याने शासनाकडे याचा पाठपूरावा केला नाही.असे असले तरी महात्मा गांधी हेच आपले दैवत मानून ग्रामस्थ स्वखर्चाने यात्रा भरवून प्रजासत्ताक दिन राष्ट्र प्रेमाने उजळ करीत आहेत.
गेल्या ६७ वर्षापासून ही यात्रा अखंडपणे आजही सुरू असून कूठल्याही देव देवतांच्याकिंवा पिराच्या व दर्गाच्या यात्रा न भरवता आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी मोठे योगदान दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने प्रजासत्ताक दिनी यात्रा भरविण्याचे काम उजेड वासीयांनी केले असून ही परंपरा पिढ्या न पिढ्या सुरू राहणार असल्याचे यात्रा कमिटीचे संयोजक शकील देशमुख, ग्रा.पं.सदस्य अनंत जाधव यांनी सांगितले. यावेळी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रा.पं. व सोसायटी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.