पुणे : अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. राम मंदिराच्या या सोहळ्याला इंडिया आघाडीचे नेते जाणार नाहीत. या सोहळ्यास महाराष्ट्रातून शरद पवार, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवले नसल्याचे आरोप झाले होते. परंतु ट्रस्टकडून शरद पवार यांना निमंत्रण आले आहे. शरद पवार यांनी २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी आमंत्रण मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रस्टकडून आलेल्या आमंत्रणाबद्दल महासचिव चंपत राय यांचे शरद पवार यांनी आभार मानले आहेत. यासंदर्भात पत्र देताना आभार मानताना खोचक उत्तरही दिले आहे.
भगवान राम भारतातीलच नाही तर जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. जगभरातील कोट्यवधी भक्तांची आस्था भगवान राम यांच्यासंदर्भात आहे. अयोध्येतील समारंभासंदर्भात रामभक्तांमध्ये उत्सुकता आहे. यामुळे मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत येत आहेत. त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक समारंभाचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. अयोध्येत मोठ्या संख्येने रामभक्त येणार असल्यामुळे २२ जानेवारीच्या नंतर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आपण येणार आहोत. माझे अयोध्येला येणे नियोजित आहे. मी अयोध्येत दर्शनासाठी येईल तोपर्यंत राम मंदिराचे काम देखील पूर्ण झाले असेल असाही पत्रात उल्लेख आहे.
पत्रातून पवारांनी अपूर्ण कामावर ठेवले बोट
शरद पवार यांनी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना पत्र पाठवले. त्यात आभार मानत असताना काम अपूर्ण असल्याची जाणीव करून दिली. यामुळे शरद पवार यांच्या या पत्राची चर्चा होत आहे. एकीकडे देशातील नागरिकांचे लक्ष अयोध्येतील सोहळ्याकडे लागले असताना विरोधकांकडून उणीवा दाखवल्या जात आहेत.