बोरी : येथील शेतकरी तथा व्यापारी पांडुरंग नवाळ हे आपल्या शेतात जात असताना दोन जणांनी दुचाकीवर पाठलाग करून पोलिस असल्याचे सांगून आम्हाला तुमची तपासणी करायची आहे असे सांगून त्यांची दुचाकी थांबवली. त्यांच्याकडील कागदपत्र व खिशातील साहित्य, सोन्याची चैन, अंगठी दस्तीत बांधून ठेवले. यानंतर तुमची डीकी उघडा असे सांगितले. डीकी उघडत असताना त्यांनी दस्तीतील सोन्याची चैन व अंगठी काढून घेतली.
त्यानंतर दस्तीत बांधलेले साहित्य डिकीट टाका व थेट शेताकडे जा असे सांगितले. तपासणी झाल्याचे सांगितल्यानंतर नवाळ यांनी काही अंतरावर गेल्यावर डीकीतील साहित्याची तपासणी केली असता अंगठी व चैन आढळून आली नाही. त्यांनी तात्काळ बोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली परंतू या प्रकरणी कोणता गुन्हा दाखल झाला याची माहिती पोलिसांकडून मिळू शकली नाही.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीचा शोध घेतला परंतू आरोपी पसार झाले होते. ही घटना दि.१४ रोजी दुपारी ३.३० वाजता घडली. बोरी येथील शेतकरी तथा व्यापारी पांडुरंग नवाळ दुकानावरून आपल्या शेताकडे दुचाकीवर परभणी जिंतूर महामार्गावरून जात असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर त्यांची दुचाकी पोलिस असल्याची बतावणी करून अन्य दुचाकीस्वारांनी अडवली.
आम्ही गाडी थांबण्यासाठी आवाज दिला असता तुम्ही गाडी थांबली नाही असे सांगून तुमची तपासणी करायची आहे असे सांगितले. त्यांच्या खिशातील साहित्य, अंगावरील सोने काढून घेतले हातचालाखीने सोने काढून घेत बाकी साहित्य डिकीत टाकून दिले व तुम्ही या ठिकाणी थांबू नका थेट शेताकडे जा असे सांगून चोरटयांनी पोबारा केला. काही अंतरावर गेल्यानंतर नवाळ यांनी खिशातील साहित्याची तपासणी केली असता सोन्याची चैन व अंगठी आढळून आली नाही. या घटनेची माहिती तात्काळ त्यांनी बोरी पोलिसांना दिली. या घटनेमुळे बोरी व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.