तेलअवीव : हमासच्या ताब्यातील गाझा शहराला पूर्णपणे वेढा घातल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. इस्रायली सैन्याचे स्पोकपर्सन डेनियल हगारी यांनी गुरुवारी सांगितले की हमासच्या विरोधात सैन्याने जमिनीवर केलेल्या हल्ल्यानंतर आम्ही गाझा शहराला चारही बाजूंनी वेढले आहे. हगारी यांनी प्रसारमाध्यमांना असेही सांगितले की, आम्ही हमासच्या विरोधात आमची कारवाई सुरूच ठेवू.
हमासच्या अल-कस्साम ब्रिगेड्सने इस्रायलला इशारा दिला की, गाझामध्ये जमिनीवर आक्रमण करणारे इस्रायली सैन्य काळ्या बॅगेतून परत जाणार. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गेल्या आठवड्यात हमासविरुद्धची लढाई दुस-या टप्प्यात पोहोचल्याची माहिती दिली होती. पंतप्रधान कार्यालयाकडून गुरुवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायली सैन्य युद्ध जिंकण्याच्या जवळ आहे.
सैन्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, युद्धातील त्यांचे प्राधान्य हमासकडून त्यांच्या ओलीसांची सुटका करून त्यांना परत आणणे आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी असेही सांगितले की, सरकारने गाझाला इंधन पुरविण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, परंतु इस्रायल अन्न आणि पाणी यासारख्या अत्यावश्यक मदत पुरवण्यात मदत करत आहे.
डब्ल्यूएचओचा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनोम घेब्रेयसस यांनी गंभीर इशारा दिला की, गाझा पट्टीतील रुग्णालये जबरदस्तीने रिकामी केल्याने शेकडो रुग्णांचा जीव धोक्यात येईल. डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की, जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की त्याचे वर्णन करणे कठीण आहे. घेब्रेयसस म्हणाले, गाझा शहर आणि उत्तर गाझामधील २३ रुग्णालये रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि या परिस्थितीत जबरदस्तीने स्थलांतरित केल्याने शेकडो रुग्णांचे जीव धोक्यात येऊ शकतात. युद्धात १०,००० हून अधिक लोक मारले गेले आहेत, ज्यात गाझामधील ८,५०० हून अधिक आणि इस्रायलमधील १,४०० हून अधिक लोकांचा समावेश आहे. दोन्ही बाजूंनी मृत्यू झालेल्यांमध्ये प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.