रायपूर : छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात २० जागांसाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराचा धुरळा उडत चालला आहे. प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसांत सर्व पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात उतरणार असल्याने रंगत वाढणार आहे. काँग्रेस आणि भाजपने यावेळी प्रत्येकी ४० नेत्यांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलेली आहे.
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी-वढेरा यांचा समावेश आहे. दुसरीकडे भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींचा समावेश आहे. सिनेजगतातील लोकही प्रचार करणार असल्याने लोकांमध्ये आकर्षण निर्माण झाले आहे. बस्तर आणि दुर्ग क्षेत्रातील आठ मतदार संघांपासून स्टार प्रचारकांच्या प्रचारास सुरुवात होणार आहे.
तिकीट वाटपानंतर जसे छत्तीसगड भाजपमध्ये घमासान निर्माण झाले आहे, तसे ते काँग्रेसमध्येही दिसून येत आहे. सरगुजा विभागातील एका माजी मंत्र्यासह चार विद्यमान आमदारांचे तिकीट काँग्रेसने कापले आहे. तिकीट कापण्यात आलेल्या आमदार चिंतामणी महाराज यांनी जाहीरपणे भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. महाराजांची समजूत काढण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री विष्णू देव साय यांच्यासह ज्येष्ठ नेते बृजमोहन अग्रवाल, संजय श्रीवास्तव यांनी श्रीकोट आश्रमाकडे धाव घेतली. मात्र, चिंतामणी महाराजांची नाराजी दूर झालेली नाही. महाराज जर भाजपमध्ये सामील झाले तर दोन ते तीन मतदारसंघांवर प्रभाव पडू शकतो. महाराज आधी भाजपमध्येच होते. २०१३ मध्ये तिकीट न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लुंड्रा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते. २०१८ साली त्यांना सामरी मतदारसंघ देण्यात आला. यावेळीही त्यांनी विजय मिळवला; पण यावेळी त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे.