28.6 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeराष्ट्रीयतीन राज्यांत सत्तांतर, तेलंगणात काँग्रेसची मुसंडी

तीन राज्यांत सत्तांतर, तेलंगणात काँग्रेसची मुसंडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाचपैकी चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून त्यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या तीन राज्यांवर भाजपने जोरदार मुसंडी मारत कॉंग्रेसला धक्का दिला. या तिन्ही राज्यांत भाजप आणि कॉंग्रेस पक्षातच थेट लढत होती. त्यामुळे दोन्ही पक्षांत चुरस असल्याचे मानले जात होते. मात्र, यात भाजपने एकहाती विजय मिळविला. या तिन्ही राज्यांत कॉंग्रेसला करिश्मा दाखविता आला नसला तरी तेलंगणात केसीआर यांच्या बीआरएसला धूळ चारून काँग्रेसने १० वर्षांनंतर पुन्हा सत्ता हस्तगत केली. आता मिझोरम राज्याचा निकाल उद्या लागणार आहे. दरम्यान, राजस्थानात १०७, मध्य प्रदेशात १६५ तर छत्तीसगडमध्ये ५६ जागा जिंकत भाजपने या तिन्ही राज्यांत स्पष्ट बहुमत मिळवले.

मिनी लोकसभा असे समजल्या जाणा-या ५ राज्यांपैकी ४ राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने ३ राज्यांत जोरदार मुसंडी मारली. या अगोदर येथे कॉंग्रेस-भाजपमध्ये चुरस असल्याचे एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले होते. तसेच छत्तीसगडमध्ये पुन्हा कॉंग्रेसच येईल, असाही अंदाज वर्तवला होता. मात्र, एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरवत भाजपने या तिन्ही राज्यांत मोठे यश मिळविले. मध्य प्रदेशात मागील १८ वर्षांपासून शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता राहिलेली आहे. त्यामुळे राज्यात भाजपला धक्का बसेल, असा अंदाज होता. त्यादृष्टीने कॉंग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे कॉंग्रेसचा सहज विजय होईल, असे वाटत होते.

सुरुवातीचे कल सुरू झाले तेव्हा १०० जागांपर्यंत चुरस होती. मात्र, त्यानंतर भाजपने आघाडी घेतली. राज्यात २३० पैकी भाजपने १६४ जागा मिळवित एकहाती विजय मिळविला. येथे कॉंग्रेसला ६५ आणि इतर १ असे बलाबल झाले. राजस्थानमध्येही कॉंग्रेस प्रबळ ठरेल, असे वाटत होते. मात्र, तेथेही भाजपने मुसंडी मारली. दर पाच वर्षांत सत्ता परिवर्तनाची परंपरा कायम ठेवली. राज्यात १९९ पैकी भाजपने ११५ जागांवर विजय मिळविला. यात कॉंग्रेसला ६९ तर बसपा २ आणि इतरांना ११ जागा मिळाल्या. तसेच छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस एकहाती विजय मिळवेल, असे वाटत असताना अखेरच्या क्षणापर्यंत चुरस होती. मात्र, त्यानंतर येथेही भाजपने ५४ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. येथे कॉंग्रेसला ३६ जागांवर समाधान मानावे लागले. यातून पुन्हा एकदा भाजपचा करिश्मा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे या तिन्ही राज्यांत मुख्यमंत्रीपदाचे चेहरे नव्हते. मात्र, मोदींमुळे पक्षाला मोठे यश मिळाले. असे जरी असले तरी तिन्ही राज्यांत कॉंग्रेसनेही चांगली लढत दिली. त्यामुळे चांगलीच चुरस पाहायला मिळाली.

दरम्यान, तेलंगणातही राज्य निर्मितीपासून म्हणजे मागच्या १० वर्षांपासून केसीआर यांच्या बीआरएसची सत्ता होती. ही सत्ता उलथवून टाकण्यात कॉंग्रेसला यश मिळाले. कॉंग्रेसने येथे ११९ पैकी ६४ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता काबिज केली. येथे कॉंग्रेसचे रेवंत रेड्डी यांनी आपला करिश्मा दाखविला. त्यामुळे तेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. या विजयामुळे राज्यात केसीआरला येथे फार मोठा धक्का बसला. येथे बीआरएसला ३९ जागांवर समाधान मानावे लागले. तसेच भाजपलाही ८ जागा मिळाल्या. त्यांना १३ टक्के मते मिळाली. त्यामुळे त्यांचा फायदा झाला.

मध्य प्रदेशात भाजपची खेळी यशस्वी
गेल्या १८ वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता असल्याने लोकांमध्ये एक प्रकारची नाराजी असल्याची चर्चा होती. त्यासाठी भाजपने आपल्या काही केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवले. तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांचीही ताकत भाजपच्या कामी आली. त्यामुळे या राज्यात पाचव्यांदा भाजपने सत्ता मिळवली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR