18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीसंतापलेल्या पतीने शाळेत जाणा-या पत्नीला संपवले

संतापलेल्या पतीने शाळेत जाणा-या पत्नीला संपवले

परभणी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे नात्याला काळिमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी घडली. बोरीतील एका शाळेत नववीत शिकणा-या जयश्री विश्वनाथ वाव्हळ (१६) या मुलीची तिच्याच पतीने धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना घडली.

बोरी गावातील संभाजीनगरमध्ये राहणा-या जयश्री वाव्हळ हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे राहणारे रोहित गायकवाड (२२) याच्याशी झाला होता. जयश्रीला शिक्षणाची आवड असल्याने तिने माहेरी बोरी येथे येऊन एका शाळेत नववीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. दरम्यान गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास जयश्री वाव्हळ ही शाळेत जाण्यासाठी निघाली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्याने एकटी जात असताना पाठीमागून पती रोहित गायकवाड याने धारदार शस्त्राने जयश्रीवर वार केले. यात मानेवर व चेह-यावर सपासप वार करीत गंभीर जखमी केले. यात जयश्री रक्ताच्या थारोळ्यात जागेवर पडली.

घटनेची माहिती मिळताच बोरी पोलिस ठाण्याचे जमादार कृष्णा शहाणे, सय्यद गयासोद्दीन यांनी गंभीर जखमी जयश्रीला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती काळे यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठविले. दरम्यान परभणीतील जिल्हा रुग्णालयात तिला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. यावेळी सपोनि. सरला गाडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात
घटनेनंतर रोहित गायकवाड हा पोलिस ठाण्यात हजर झाला. यावेळी वारंवार सांगूनही पत्नी जयश्री ही आपल्या सोबत राहायला तयार होत नसल्याने आपण रागाच्या भरात तिचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR