महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील केमिकल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत ७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर उर्वरित चार कामगार अद्याप बेपत्ता आहेत. महाडमधील ब्लू जेट केमिकल कंपनीत आग लागली होती. त्यामध्ये ११ कामगार अडकले होते. गॅस गळतीमुळे आधी स्फोट झाला आणि मग आग भडकल्याची माहिती आहे.
सकाळी ११ च्या सुमारास या ठिकाणी भीषण आग लागली. त्यामध्ये ११ कामगार अडकले होते. तर पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अडकलेल्या ११ कामगारांपैकी ७ जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर इतर चार जण बेपत्ता आहेत. या ठिकाणी अद्याप शोधकार्य सुरू आहे. आग विझवली गेली आहे पण आतील मशिनरी जोपर्यत थंड होत नाहीत तोपर्यत शोधणे फार कठीण आहे. या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमला बोलावले आहे.
ज्या प्लँट मध्ये स्फोट झाला, त्या प्लँटचे ट्रक्चर दबल्याने आत शोध पथकाला आत जाता येत नाही. शोधपथकाचं काम नेमकं कितपत झालं याची माहिती प्रशासन अधिकृतपणे देत नाही. घटनास्थळी रात्री १ वाजता राज्याचे उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत भेट देणार आहेत.
अग्निशमन दलाच्या मदतीने वेळेत आग विझवण्यात आली. सध्या कंपनी नुकसानीच्या प्रमाणात मूल्यांकन करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि आवश्यक प्रक्रिया सुरू केल्या आहेत. कंपनीकडे या प्लँटमधील मालमत्तेसाठी विमा संरक्षण आहे.
नेमके काय घडले?
ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड ही कंपनी रायगडमधील महाडमध्ये आहे. या कंपनीत सकाळी ११ च्या सुमारास मोठा आवाज झाला. हा आवाज स्फोटाचं असल्याचं क्षणार्धात लक्षात आलं. या स्फोटामुळे सगळीकडे धावपळ सुरु झाली. आधी गॅस गळती झाली की आधी स्फोट झाला याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. मात्र स्फोट आणि गॅस गळती सुरु झाल्यानंतर, सर्वत्र आग पसरू लागली. यामध्ये कंपनीतील काही कर्मचारी अडकल्याची भीती आहे.
या स्फोटानंतर आगीने क्षणार्धात पेट घेत, सगळीकडे आग पसरली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय पोलीसही दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या गॅसगळतीमुळे एका कामगाराची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात येत आहे.