नवी दिल्ली : बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (सेबी) म्हणणे आहे की, जास्त सबस्क्रिप्शन दाखवण्यासाठी आयपीओ अर्जांमध्ये हेराफेरीची प्रकरणे तपासली जात आहेत. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी सांगितले की, सेबी अशा तीन प्रकरणांची चौकशी करत आहे. मात्र, तपासाचे स्वरूप त्यांनी सांगितले नाही.
त्या म्हणाल्या की, गैरप्रकारांमध्ये काही मर्चंट बँकर्सची नावेही समोर आली आहेत. एआयबीआय २०२३-२४ च्या वार्षिक परिषदेमध्ये बुच यांनी ही माहिती दिली. गेल्या काही महिन्यांत डझनभर कंपन्या बाजारात लिस्ट झाल्या आणि बहुतेक आयपीओंना अनेक पट सबस्क्रिप्शन मिळाले. एआयबीआय अर्थात असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच म्हणाल्या की, आयपीओ बरेच व्यापारी खरेदी करत आहेत पण यात गुंतवणूकदार नाहीत. जास्त सबस्क्रिप्शन दाखवण्यासाठी बनावट खाती वापरली जात आहेत. सेबीला याबाबतचे संकेत मिळाले आहेत. हे थांबवण्यासाठी लवकरच पावले उचलली जातील.
रिटेल गुंतवणूकदारांनी आयपीओनंतर दुय्यम बाजारात गुंतवणूक करावी, असे सेबीच्या प्रमुख म्हणाल्या. आयपीओमध्ये मोठ्या संख्येने लोक विक्री करतात आणि आयपीओ लिस्ट झाल्यानंतर लगेच निघून जातात. आकडेवारीनुसार, ४३% किरकोळ गुंतवणूकदार शेअर्सची विक्री करतात आणि लिस्ट झाल्यानंतर १ आठवड्याच्या आत बाहेर पडतात.