परभणी : महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावित विधेयकातील जाचक नियमा विरुध्द तसेच प्रस्तावित पाचही कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवार ते शनिवार, दि.४ या कालावधीत पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये परभणी जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते सहभागी झाले आहेत. सर्वांनी आपली विक्री केंद्रे बंद ठेवल्यामुळे या ठिकाणी शुकशुकाट दिसून आला.
परभणी जिल्हा बियाणे, खते व कीटकनाशके अधिकृत विक्रेता महासंघातर्फे या संदर्भात जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कृषी निविष्ठा विक्री करणा-याविरूध्द कठोर कारवाई करण्यासाठी सध्या प्रचलित असलेले कायदे पुरेसे आहे. मात्र राज्य शासनाकडून पुन्हा नवीन कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रस्तावित कायद्यातील तरतुदी विक्रेत्यासाठी अत्यंत जाचक आहेत. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रीचा व्यवसाय करणे अशक्यप्राय होणार आहे.
राज्यातील विक्रेते हे कोणत्याही कृषी निविष्ठांचे उत्पादन करीत नाहीत. कृषी विभागाकडून मान्यताप्राप्त उत्पादक कंपन्यांच्या कृषी निविष्ठा ह्या सीलबंद पॅकिंगमध्ये खरेदी करून शेतक-यांना सीलबंद पॅकिंगमध्ये विक्री करतात. कृषी विभागाकडून मान्यताप्राप्त सीलबंद व पॅकमधील निविष्ठांच्या दर्जाबाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजण्यात येऊ नये. योग्य निविष्ठा विकणा-या कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर जरब बसविण्यासाठी अन्यायकारक कायदे विक्रेत्यांवर लादू नयेत अशी राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांची मागणी आहे. त्या मागणीला परभणी जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी पाठिंबा म्हणून सर्व कृषी केंद्रे बंद ठेवली आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर परभणी जिल्हा बियाणे, खते व कीटकनाशके अधिकृत विक्रेता महासंघाचे अध्यक्ष रमेश देशमुख, सचिव बाळासाहेब चोपडे आदींच्या सह्या आहेत.