नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात मालमत्तेच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. विशेषत: देशातील मोठ्या शहरांमध्ये या किमतीत मोठी वाढ होत असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालातून ही माहिती मिळाली. अहवालात दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात देशातील प्रमुख शहरांमधील मालमत्तेच्या किमतीत सुमारे १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता घर खरेदी किंवा मालमत्ता खरेदी करणे महाकठीण होऊन बसले आहे. त्यामुळे अनेकांचे घर खरेदीचे स्वप्न केवळ स्वप्नच राहण्याची चिन्हे आहेत.
स्वत:चे घर किंवा मालमत्ता खरेदी करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. कारण देशात मालमत्तेच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार ही बाब समोर आली आहे. मॅजिकब्रिक्स प्रोपइंडेक्स अहवालातून ही माहिती मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिस-या तिमाहीतील म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या तीन महिन्यांच्या काळातील ही माहिती आहे. या अहवालानुसार डिसेंबर तिमाहीत देशातील १३ प्रमुख शहरांमधील मालमत्तेच्या किमती वार्षिक आधारावर १८.८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा अर्थ डिसेंबर २०२२ च्या तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर २०२३ च्या तिमाहीत किमती १८.८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तिमाही आधारावर मालमत्तेच्या किमती ३.९७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
डिसेंबरच्या तिमाहीत प्रमुख शहरांमध्ये मालमत्तेच्या किमती वेगाने वाढल्या. त्यामुळे मागणीत मोठी घट झाली. या तिमाहीत निवासी मालमत्तेचा एकूण पुरवठा वर्षभरापूर्वीच्या तुलनेत १६.९ टक्क्यांनी घटला आहे. पुरवठ्यात वाढ केवळ मुंबई आणि हैदराबादमध्ये नोंदवण्यात आली. तिस-या तिमाहीत या दोन शहरांमधील निवासी मालमत्तांचा पुरवठा अनुक्रमे ४.२ टक्के आणि ०.४ टक्क्यांनी वाढला आहे.
गुरुग्रामध्ये सर्वाधिक वाढ
अहवालात दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या तिमाहीत देशातील प्रमुख शहरांमध्ये गुरुग्राममध्ये किमतींमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. गुरुग्राममधील मालमत्तेच्या किमती एका वर्षात ३२.१ टक्क्यांनी वाढल्या. ग्रेटर नोएडा ३१ टक्के वार्षिक वाढीसह दुस-या स्थानावर आहे आणि नोएडा २६.१ टक्के वार्षिक वाढीसह तिस-या स्थानावर आहे. या कालावधीत हैदराबादमधील मालमत्तेच्या किमती वार्षिक आधारावर १५.८ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
मागणीत घट
डिसेंबरच्या तिमाहीत किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असली तरी मागणीत समांतर वाढ झालेली नाही. या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षाच्या तिस-या तिमाहीत मालमत्तेची मागणी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत केवळ २ टक्क्यांनी वाढली आहे. त्रैमासिक आधारावर मागणीत मोठी घट झाली. त्यानुसार मागणी १६.९ टक्क्यांनी घटली आहे. मागणीत घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे किमतीत झालेली प्रचंड वाढ हे आहे.