औसा : प्रतिनिधी
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त (दि.२२) रोजी औसा शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्या अनुषंगाने औसा शहरातील राम मंदिरात सकाळी ८ वाजता महाआरती होणार आहे. या आरतीस शहरातील संत महंत व सर्व राम भक्तांची उपस्थिती राहणार आहे. शहरात होणा-या विविध कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.
श्रीराम मंदिर औसा ते हनुमान मंदिर औसा शोभायात्रा सकाळी ८ वा.३० मिनिटाला निघणार आहे. मंदीरामधे श्रीरामरक्षा व हनुमान चालीसा सामुहिक पठण करण्यात येणार आहे.रामजन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविलेल्या कारसेवकाचा आ.अभिमन्यू पवार यांच्या वतीने यथोचित सन्मान ही केला जाणार आहे. अयोध्या नगरीत होणा-या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे लाईव्ह प्रेक्षपण सकाळी १०.४५ ते दुपारी १.४५ पर्यंत वीर हनुमान मंदिर समोर रामभक्ताना पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यात शहरातील हजारो राम भक्त सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक भक्ताला गांधी चौक येथील ंिहगोली अंबिका मंदिरात महाप्रसादाची सोय केली आहे.
सायंकाळी ७ ते १० पर्यंत शहरातील मुख्य रस्त्यावरून छत्रपती संभाजी महाराज चौक ते विर हनुमान मंदिर ते औसा टी पॉईंट पर्यंत व तेथून परत बस स्थानक जवळील वीर हनुमान मंदिरापर्यंत दुचाकी रॅली व आतिषबाजी होणार आहे.अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.तेव्हा सर्व श्रीराम भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार व श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे. या अनुषंगाने आमदार अभिमन्यू पवार व रामभक्तांनी शहरासह मतदारसंघातील अनेक मंदिरांची स्वच्छता केली आहे. तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण उटगे यांनी केले आहे.