माजुली : भाजपला आदिवासींना जंगलात बंदिस्त ठेवून त्यांना शिक्षण व इतर संधींपासून वंचित ठेवायचे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेत केला. या यात्रेच्या आसाममधील आजच्या दुस-या दिवशी त्यांनी मोटारीतूनच सभेला संबोधित केले. सभेला प्रामुख्याने आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. काँग्रेसने आदिवासींचा प्रथम रहिवासी म्हणून संसाधनांवर असलेला हक्क ओळखल्याचा दावाही त्यांनी केला.
राहुल गांधी आदिवासींना उद्देशून म्हणाले, की आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो कारण तुम्ही प्रथम रहिवासी आहात. भाजप मात्र तुम्हाला वनवासी म्हणतो, ज्याचा अर्थ जंगलात राहणारा असा होतो. भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आदिवासींना जंगलात बंदिस्त ठेवून त्यांच्या मुलांना शाळा-विद्यापीठांत शिक्षण घेण्यापासून, इंग्रजी शिकणे, व्यापार करण्यापर्यंत वंचित ठेवायचे आहे. जे तुमचे आहे, ते तुम्हाला परत मिळाले पाहिजे. जमीन, पाणी आणि जंगले तुमचीच असली पाहिजेत. भाजपचे सरकार देशभरातील आदिवासींच्या जमिनी हडप करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले की, तुमच्यासोबत (आदिवासींसोबत) काय घडते आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुमच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. तुमचा इतिहास पुसून टाकला जात आहे, ही देशभरातील वस्तुस्थिती आहे. कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान २०२२-२३ मध्ये काढलेली भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. त्यामुळे लोकांनी या दक्षिण ते उत्तर यात्रेनंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे अशीच यात्रा काढण्याचा आग्रह धरला. म्हणून आम्ही मणिपूरपासून या यात्रेची सुरुवात केली.
रस्त्यावर चालण्यासाठी परवानग्या कशाला?
आसाम सरकारने रस्त्यांवर चालण्यासाठी अनेक प्रकारच्या परवानग्यांची सक्ती केल्यावरून काँग्रेसचे आसामचे प्रदेशाध्यक्ष भूपेनकुमार बोराह यांनी राज्य सरकावर टीका केली. जोरहाट येथे यात्रेच्या परवानगी दिलेल्या मार्गाऐवजी दुस-या मार्गावरून यात्रा काढल्याबद्दल यात्रेचे प्रमुख आयोजक के.बी. बायजू यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात बोराह म्हणाले, आम्ही याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली होती. रस्त्यावरून चालण्यासाठी किती परवानग्या घ्यायला हव्यात? आसाममध्ये दोन दिवसांना जेवढ्या अडचणी उद्भवल्या, तेवढ्या इतरत्र कुठेच आल्या नाहीत, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे.