पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आता २२ ऐवजी २३ जानेवारीला (मंगळवारी) प्रसिद्ध होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. २२ जानेवारीला देशभरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा असल्याने केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारने सुटी जाहीर केल्याने दुस-या दिवशी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुस-यांदा मुदत बदलण्यात आली.
या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव राजेश कुमार सिंग यांनी काल उशिरा परिपत्रक जारी केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यापूर्वी २७ ऑक्टोबरला महाराष्ट्रात प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नवमतदारांना नोंदणी तसेच मयत आणि दुबार नावे वगळणे, मतदान कार्ड, पत्त्यात दुरुस्ती अशा कामांसाठी ९ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, हरियाणा, झारखंड, केरळ, पंजाब, तामिळनाडू, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि दिल्ली अशा १२ राज्यांमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत २२ जानेवारी दिली होती.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, ‘देशात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या २२ जानेवारीला देशभर साजरा केला जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारने अर्धा दिवस सुटी जाहीर केली आहे. तर राज्य सरकारने सर्व सरकारी कार्यालयांना २२ जानेवारीला सुट्टीच जाहीर केली आहे. त्यामुळे त्या दिवशी सरकारी कार्यालये बंद असणार आहे. परिणामी, २२ ऐवजी २३ जानेवारीला आता अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याबाबत आम्हाला निर्देश दिले आहेत.’