जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मनोज जरांगे पाटील यांनी हजारो आंदोलकांसह अंतरवाली सराटी येथून आज मुंबईच्या दिशेने कूच केली. यावेळी मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांतून आंदोलक संपूर्ण लवाजम्यासह अंतरवालीत दाखल झाले होते. त्यामुळे आज हजारो आंदोलकांसह जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने पायी रवाना झाले. आंदोलकांच्या हाती भगवा ध्वज आणि जय भवानी, जय शिवरायची घोषणा यामुळे परिसर दणाणून गेला होता. त्यांचा पहिला मुक्काम त्यांचे जन्मगाव मातोरीत झाला. हे आंदोलक २६ जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहेत.
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण मिळावे, यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे उपोषण करणार आहेत. यासाठी अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे यांनी पायी दिंडी काढली आहे. या आरक्षण दिंडीचा पहिला मुक्काम आज जरांगे यांचे जन्मगाव असलेल्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी येथे झाला. तत्पूर्वी दुपारच्या जेवणाची व्यवस्था गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे करण्यात आली होती. तेथे ७० क्विंटल खिचडीचे नियोजन करण्यात आले होते. एकही मराठा मावळा उपाशी जाता कामा नये, असे नियोजन मराठा बांधवांकडून करण्यात आले होते. त्यासाठी गावक-यांनी ७० क्विंटल खिचडी आणि २० क्विंटलचा उपमा, पुरी, बाजरीच्या भाकरीची व्यवस्था करणयत आली.
मातोरीत जेवण, राहण्याची सोय मातोरीत ३०० एकरांवर मंडप
जरांगे यांचे जन्मगाव असलेल्या मातोरी येथील गावक-यांनी मराठा आंदोलकांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली. यासाठी तब्बल ३०० एकरांवर मंडप उभारला आणि २०० पोती बुंदीची व्यवस्था केली. या मराठा मराठा आंदोलकांची व्यवस्था शिरूर, पाटोदा, आष्टी तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी केली. त्यासाठी ६ लाख भाकरी, तीनशे क्विंटलची भाजी तयार केली. सोबतच पिण्याच्या पाण्यासाठी शंभर टँकर, २ लाख पाण्याच्या बाटल्या व अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्थाही केली गेली.
हजारो आंदोलकांचा सहभाग
जरांगे पाटील मराठा आंदोलकांसह शनिवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी निघणार असल्याचे अगोदरच जाहीर केले होते. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांतून हजारो आंदोलक आपापल्या गाड्या आणि खाण्या-पिण्याच्या व्यवस्थेसह आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे आज भगवे वादळ मुंबईच्या दिशेने जाताना दिसले.