लंडन : अयोध्येतील राम लल्लाच्या अभिषेकासाठी आता एक दिवस उरला आहे. जसजसा रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा दिवस जवळ येत आहे. रामभक्तांमध्येही आनंद वाढत आहे. देशात असो की परदेशात, सर्वत्र रामभक्तांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. लंडनमधील हाऊस ऑफ कॉमनमध्येही रामभक्तांचे भगवान श्रीरामांप्रती असलेले प्रेम पहायला मिळाले.
युगपुरुष नावाचा कार्यक्रम सनातन संस्था यूकेने हाऊस ऑफ कॉमनमध्ये सादर केला. ज्यामध्ये रामाच्या अयोध्या नगरीची गाथा संगीताच्या माध्यमातून मांडण्यात आली. यावेळी लंडनमध्ये रेडिओ जॉकी म्हणून कार्यरत असलेल्या आणि मिथिलाचे प्रतिनिधित्व करणा-या बेतिया येथील चंदा झा यांनी संगीताद्वारे राम गीत सादर केले.
यादरम्यान, हाऊस ऑफ कॉमनमध्ये बसलेल्या सर्व लोकांनी एकत्र गाणे गायले. मुलांनी भरतनाट्यमच्या माध्यमातून प्रभू रामाच्या जीवनपटाचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पद्मश्री ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन हे देखील उपस्थित होते. त्यांनी भगवे वस्त्र परिधान करून जय श्री रामच्या घोषणा दिल्या. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सनातन आणि हिंदुत्वाचा प्रचार करणे हा आहे.