मुंबई : खिचडी घोटाळाप्रकरणी १८ जानेवारी रोजी ईडीने केलेली अटक बेकायदा असून सत्र न्यायालयाच्या निकालाला सूरज चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे.
कोणत्याही गुन्ह्यात चव्हाण यांचे नाव आरोपी म्हणून नाही त्यामुळे चव्हाण यांना अटक करता येणार नाही तसेच सत्र न्यायालयाने दिलेले कोठडीचे आदेश रद्द करावेत अशी मागणी चव्हाण यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर हायकोर्टात २९ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
युवा सेना कोअर कमिटीचे सदस्य तसेच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणा-या सूरज चव्हाण यांना ईडीने खिचडी घोटाळाप्रकरणी अटक केली आहे. सूरज चव्हाण यांची ईडी कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज विशेष पीएमएलए कोर्टात सादर करण्यात आले. यावेळी विशेष पीएमएलए कोर्टाने आज सूरज चव्हाणच्या ईडी कोठडीत २५ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.