नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२३ सालचा सर्वोत्तम एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. या संघात भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह सहा भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेच्या दोन-दोन तर न्यूझिलंडच्या एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. या संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. आयसीसीने रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना सलामी जोडी म्हणून निवडले आहे. गिलने २०२३ मध्ये ५० षटकांचा फॉरमॅट चांगलाच गाजवला. त्याने २९ सामन्यांमध्ये ६३.३६ च्या उत्कृष्ट सरासरीने १५८४ धावा केल्या.
ट्रॅव्हिस हेडला तिस-या क्रमांकावर पसंती
तिस-या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला पसंती मिळाली आहे. त्याने विश्वचषकाच्या उपान्त्य सामन्यात आणि अंतिम सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जेतेपदाच्या सामन्यात भारताविरुद्ध शतक झळकावून हेडने इतिहास रचला होता.
विराट चौथा फलंदाज
टीम इंडियाचा चेस मास्टर विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. त्याने गेल्या वर्षी २७ सामन्यांत ७२.४७ च्या सरासरीने १,३७७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ शतके झळकावली.
डॅरेल मिशेल पाचव्या स्थानी
मिशेल याला पाचव्या स्थानी फलंदाजीसाठी निवडले आहे. त्याने गेल्या वर्षी १,२०४ धावा केल्या होत्या. गेल्या वनडे वर्ल्ड कपमध्येही त्याने उत्कृष्ट प्रदर्शन करत ६९.०० च्या सरासरीने ५५२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तीन भारतीय गोलंदाजांना स्थान
आयसीसीने आपल्या संघात तीन भारतीय गोलंदाजांचा समावेश केला आहे. संघाच्या वेगवान गोलंदाजीची कमान मोहम्मद शमीकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर मोहम्मद सिराजलाही संघात स्थान मिळाले आहे. कुलदीप यादव फिरकीपटू म्हणून संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
यानसेन अष्टपैलू खेळाडू
द. आफ्रिकेच्या मार्को यानसेनला अष्टपैलू म्हणून प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून यानसेनने २०२३ मध्ये २० एकदिवसीय सामने खेळले आणि २९.९६च्या सरासरीने ३३ बळी मिळवले. वर्ल्डकप २०२३ मध्ये त्याने ९ सामन्यांत १७ विकेट घेतल्या आणि फलंदाजीत १५७ धावा केल्या.
झाम्पा दुसरा फिरकीपटू
आयसीसीच्या संघात ऑस्ट्रेलियाच्या झाम्पाकडे फिरकीची जबाबदारी आहे. त्याने गेल्या वर्षी २० एकदिवसीय सामन्यांमध्ये २६.३ च्या सरासरीने ३८ विकेट घेतल्या आहेत. त्याने वर्षभरात एकूण पाच वेळा चार विकेट घेण्याची किमया केली. विश्वचषक स्पर्धेतही त्याने २२.३९ च्या सरासरीने २३ बळी घेतले आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आयसीसीचा पुरुष वनडे संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ट्रॅव्हिस हेड, विराट कोहली, डॅरिल मिशेल, हेन्रिक क्लासेन, मार्को यानसेन, अॅडम झाम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
महिलांच्या संघात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व
आयसीसीने महिलांच्या निवडलेल्या वनडे संघात ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक ५ खेळाडूंची निवड झाली आहे. या संघात एकाही भारतीय महिला खेळाडूला संधी मिळालेली नाही. श्रीलंकेच्या चमारी अटापटूला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.
आयसीसी महिला वनडे संघ
फोबी लिचफिल्ड, चमारी अटापटू (कर्णधार), ऍलिस पेरी, अमेलिया केर, बेथ मुनी, नॅट सायव्हर ब्रंट, अॅश्ले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, नादिन डी क्लार्क, ली ताहुहू, नाहिदा अख्तर.