वॉशिंग्टन : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेवरून जगभरातील बहुतांश मंदिरात उत्साहाचे वातावरण होते. अमेरिकेसह आशिया, युरोपीय देशांतील मंदिरात प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनिवासी भारतीय नागरिकांनी सुमारे ४० देशांत श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आनंदोत्सव साजरा केला.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करण्याची पद्धत अनोखी आणि आधुनिक पहावयास मिळाली. टाइम स्क्वेअर येथील भव्य पडद्यावर श्रीरामाचे चित्र झळकविण्यात आले आणि या चित्राकडे पाहत हातातील भगवे झेंडे उंचावत नागरिकांनी घोषणा दिल्या. यादरम्यान टाइम्स स्क्वेअर येथे ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिराच्या सदस्यांनी लाडू वाटप केले.
टाइम्स स्क्वेअर येथे काही बिलबोर्ड प्रकाशित करण्यात आले. दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर प्रभू श्रीरामाचे चित्र दाखवण्यात आले.
व्हर्जिनियाच्या फेअरफॅक्स कौंटीत एसव्ही लोटस मंदिरात शीख, मुस्लिम आणि पाकिस्तानी अमेरिकी समुदायाचे नागरिक सहभागी झाले.
अमेरिकेतील शीख नागरिक जस्सी सिंग यांनी हा खूप आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शीख समुदायाकडून आणि अमेरिकेतील शिखांकडून भारतात श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त हिंदू बंधू आणि भगिनींना खूप शुभेच्छा. अमेरिकेतील हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन हा आजचा आनंदाचा आणि पवित्र दिवस साजरा करत आहेत.