लातूर : प्रतिनिधी
महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, या व इतर महत्त्वाच्या प्रश्नावरुन जनतेचे लक्ष हटवून केवळ भावनिक साद घालत आगामी निवडणुका जिंकण्याचा सत्ताधारी मंडळींचा डाव आहे, तो डाव हाणून पाडण्यासाठी, राज्यभरात विभागीय बैठका घेऊन काँग्रेस पक्षाकडून नियोजन करण्यात येत आहे. २९ जानेवारी रोजी लातूर येथे मराठवाडा विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. सदरील बैठकीच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
२९ जानेवारी रोजी लातूर येथे काँग्रेस पक्षाच्या मराठवाडा विभागीय आढावा बैठकीच्या पूर्वतयारीसाठी, पक्षाचे विभागीय निरीक्षक अनिल पटेल व जिल्ह्यातील नेते, प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी लातूर काँग्रेस भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करतांना माजी मंत्री आमदार देशमुख बोलत होते. लातूरच्या परंपरेला शोभेल अशी विभागीय बैठक येथे पार पडेल, या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नियोजन करावे, त्या नियोजनाची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने परिश्रम घ्यावेत अशा सूचना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केल्या आहेत.
यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भाई नगराळे, सरचिटणीस मोइज शेख, सरचिटणीस अमर खानापुरे, सचिव अभय साळुंखे, सचिव गोरोबा लोखंडे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर दीपक सुळ, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, माजी महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, प्रवीण सूर्यवंशी, मोहन माने, एकनाथ पाटील, प्रा. प्रवीण कांबळे, विद्या पाटील सपना किसवे, डॉ. निलम पन्हाळे, कल्याण पाटील, डॉ. अरविंद भातांब्रे, अॅड. फारुक शेख, पृथ्वीराज शिरसाट, उषाताई कांबळे, सुपर्ण जगताप, डॉ. गणेश कदम, अजित माने, गोविंद देशमुख, अंगद गायकवाड, सुलेखा कारेपूरकर, आदीसह काँग्रेस
पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष सर्व शहराध्यक्ष सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पूढे बोलतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, पक्षाच्या नियोजनाची यशस्वी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने, बूथ, वार्ड, प्रभाग, गाव, शहर, तालुका, जिल्हा या सर्व पातळीवर पक्ष बांधणी करण्यासंबंधीचे मार्गदर्शनही या बैठकीत होणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सदरील लातूर येथे होणारी विभागीय बैठक बैठक उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त्त केला. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी विभागीय बैठकीचे आयोजकत्व लातूर जिल्ह्याला दिल्या बद्दल आभार व्यक्त करुन पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह महाराष्ट्रातील मान्यवर नेते यानिमित्ताने लातूरला येत आहेत. त्या सर्वांचे आदराथित्य योग्य पध्दतीने होईल याची दक्षता सर्वानी घ्यावी असेही आमदार देशमुख यांनी आर्वजून सांगितले. यावेळी बोलतांना माजी मंत्री काँग्रेसचे मराठवाडा विभागीय बैठकीचे समन्वयक अनिल पटेल म्हणाले की, आम्ही आज जे काही आहोत ते लोकनेते विलासराव देशमुख यांच्यामुळेच आहोत.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी माझ्यावर लातूरच्या बैठकीची जबाबदारी दिली. लातूरला मला समन्वयक म्हणून नेमले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. लातूरमधला कार्यक्रम महत्वपूर्ण असेल लातूर पॅटर्न सर्व राज्याला परिचित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे माजी पदाधिकारी यांना लवकरच आजी पदाधिकारी आपणाला करायचे आहे बूथ कमिटी आपल्याला सक्षम करावी लागेल कागदावर काम करणारे कार्यकर्ते न राहता फिल्डवर काम करणारे कार्यकर्ते असायला हवेत असे ते म्हणाले.
या बैठकीचे प्रास्ताविक लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, यांनी केले तर मनोगत लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लातूर शहर मीडिया काँग्रेस सेलचे अध्यक्ष व्यंकटेश पुरी यांनी केले तर शेवटी आभार माजी महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापुरे यांनी मानले.