लातूर : प्रतिनिधी
आय. ए. एस., आय. पी. एस. परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी प्रथमत: त्या परीक्षेचे स्वरुप समजून घेऊन त्या पदांची जबाबदारी नेमकी काय असते याची माहिती करुन घेणे महत्त्वाचे असते तेंव्हा या परीक्षा सोप्या होत जातील, असे मत द युनिक अकॅडमी, पुणेचे संचालक प्रा. तुकाराम जाधव यांनी व्यक्त केले.
येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या बी. ए. स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने दि. २३ जानेवारी रोजी प्रशासकीय सेवांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून द युनिक अकॅडमी, पुणेचे संचालक प्रा. तुकाराम जाधव हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतानाच मुलाखतीची तयारी करताना विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक जिवनाचा चौफेर अभ्यास करुन विश्लेषणात्मक मुद्यांचे विवेचन करणे अपेक्षीत असते असेही प्रा. तुकाराम जाधव यांनी सांगितले. या परीक्षेमध्ये निश्चितपणाने भाषेला अधिक महत्त्व देण्यात येते म्हणून भाषेवर तुमची चांगली पकड असली पाहिजे. नवीन एम. पी. एस. सी. च्या पॅटर्नचा अभ्यास करताना पूर्व, मुख्य व मुलाखतीचा अभ्यास विशिष्टपणाने करणे अपेक्षीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
अभ्यास करताना संकल्पनेची उकल करत जास्तीत-जास्त सराव करणे आवश्यक असते. एकंदरीत प्रत्यक्षात परीक्षेला सामोरे जाताना विविध मुद्यांची काळजी घेणेही आवश्यक असतेअसेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. माधव शेळके यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा. भिम यादव व आभार प्रा. नितीन पांचाळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा. प्रमोद जैन, प्रा. महेश नागरगोजे, बालाजी मसलगे, सत्यपाल येलगट्टे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.