मानवत : यशाने परिपूर्णता येत असली तरी अपयशाने नवे ध्येय गाठण्यासाठी पात्रता निर्माण होते असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी केले. मानवत येथील के.के.एम. महाविद्यालयातील अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेचा समारोप झाला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व के. के. एम. महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ ते २२ जानेवारी पर्यंत खो-खो स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या ५ राज्यातील ५६ विद्यापीठ संघ सहभागी झाले होते.
दि. २२ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्यात अंतिम सामना झाला. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरने विजय मिळवला. स्पर्धेचे उपविजेतेपद स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संघास मिळाले. संघास डॉ. पवन पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच अखिल भारतीय स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मुंबई विद्यापीठ संघ पात्र ठरले. यावेळी पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बालकिशन चांडक यांनी युवकांनी मैदानावर आले पाहिजे. क्रीडा प्रकारामुळे व्यक्तीमत्वाला वेगळा आयाम मिळतो. क्रीडा स्पर्धा आयोजित केल्यामुळे युवकांना प्रोत्साहन मिळते असे सांगितले.
यावेळी प्र. कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे, माजी क्रीडा संचालक जीवनराव गाडेगावकर, डॉ. प्रदीप देशमुख, पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बालकीशन चांडक, कोषाध्यक्ष रामचंद्रराव कत्रुवार, संचालक विजयकुमार दलाल, दिलीपराव हिबारे, संजय बांगड, जगदीश बांगड, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, डॉ. माधव शेजुळ, डॉ. महेश बेंबडे, डॉ. महेश वाकरडकर, प्रशिक्षक डॉ. पवन पाटील सहाय्यक प्रशिक्षक डॉ.संतोष सावंत संघ व्यवस्थापक डॉ. नागनाथ गजमल यांची उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा संचालक डॉ. पवन पाटील व सर्व कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले. दि. २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा समारोह असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर प्र.कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या.