नागपूर : राज्य सरकार ५४ लाख नोंदी सापडल्याचे सांगत आहे. परंतु त्यापैकी किती लोकांकडे आधीपासून कुणबी प्रमाणपत्र आहे आणि नवीन किती लोकांना असे प्रमाणपत्र दिले जाणार आहे, हे लपवून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास ओबीसी समाज रस्त्यावर आणि मुंबईत धडकेल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आहे.
राज्य सरकारला ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्या १९६७ च्या पूर्वीच्या आहेत. आजच्या तारखेची एकही नोंद नाही. १९६७ च्या पूर्वीच्या ज्यांच्याकडे नोंदी आहेत. त्यांच्याकडे आधीपासूनच कुणबी प्रमाणपत्र आहे. नागपूर जिल्ह्यात २ लाख ३५ हजार नोंदी सापडल्या आहेत. यामध्ये एकही नवीन नोंद नाही. मराठवाड्यात केवळ २८ हजार नोंदी सापडल्या आहेत. तेथे देखील बहुतांश लोकांकडे आधीपासून कुणबी जातीचे प्रमाणपत्र आहे.
जर का नवीन नोंदी १-२ टक्के असतील तर नवीन नोंदी कोणत्या आहेत त्याचा आकडा सरकारने जाहीर करायला हवा. सरकार ५४ लाख नवीन नोंदी असल्याचे सांगून ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहे. सरकारने ५४ लाख नोंदीचे सर्वेक्षण करून कोणाकडे आधीपासून प्रमाणपत्र आहे आणि नवीन नोंदी किती याची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली