मुंबई : खासगी क्लासेससंदर्भात केंद्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी क्लासचालक संघटनांची बैठक २८ जानेवारीला पुण्यात होणार आहे. ही नियमावली केवळ कोचिंग क्लासेससाठीच नाही, तर विद्यार्थ्यांसाठीही शैक्षणिकदृष्ट्या धोकादायक आहे, असे क्लासचालकांचे म्हणणे आहे. क्लासचालक संघटनांनी याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
पुणे येथे २८ जानेवारीला आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व क्लासचालक संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे ‘महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन’चे (एमसीओए) अध्यक्ष प्रजेश ट्रोट्स्की यांनी सांगितले. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी क्लासेस सहाय्य करतात. क्लासेसवरील निर्बंधांमुळे अशा विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खुंटली जाण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया ट्रोट्स्की यांनी दिली.
कोचिंग क्लासेस बंद झाले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होणार आहेच, शिवाय कोचिंग क्लासेसमध्ये काम करणा-या लाखो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांची आर्थिक घडीही विस्कटणार आहे. त्यामुळे नियमावलीच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा आणि आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
कोचिंग क्लासेसमुळे वाढणा-या आत्महत्या आणि काही ठिकाणी घडलेल्या आगीच्या घटना लक्षात घेऊन केंद्र शासनाने कोचिंग क्लासेसबाबत नियमावली प्रसिद्ध केली आहे. या नियमावलीनुसार १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये नोंदणी करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.