मुंबई : रोहित पवार यांच्या ईडी चौकशीने सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. सकाळीच दारूगोळ्यासह आलेले खासदार संजय राऊत यांनी सत्ताधा-यांवर तोफ डागली. त्यांच्या भेदक मा-याने महाविकास आघाडीचा सूर काय असेल हे स्पष्ट झाले होते. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी पण या कारवाईमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली. काहीही झाले तरी विजय सत्याचाच होईल, हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. यावेळी सुप्रिया सुळे या भावूक झालेल्या दिसल्या.
त्यांनी काय ओढले आसूड, काय म्हणाल्या त्या
‘‘सत्यमेव जयते. सत्याचा विजय होईलच. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. आव्हाने येत राहतील पण आव्हानांवर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू. हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचा आहे. जो वारसा आहे तो पुढे न्यायचे काम पवार साहेबांनी गेली सहा दशके केले आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. त्यासाठी आजही आमची लढाई सुरू आहे.’’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सध्या केंद्रीय यंत्रणांचा विरोधकांविरोधात गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारचे ऑफिशियल स्टेटमेंट आहे. याविषयीचा डेटा आहे. त्यानुसार, ९० ते ९५ टक्के प्रकरणे विरोधकांची असल्याचे त्यांनी सांगितले. आईस-म्हणजे इन्कम टॅक्स, ईडी आणि इतर यंत्रणा यांचा वापर विरोधकांविरोधात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षांना त्रास देण्याचा हा प्रकार आहे.