लखनौ : दाट धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. बसची डम्परला धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर जिल्ह्यात हा अपघात झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हरदोई डेपोची बस प्रवाशांना घेऊन जात असताना दाट धुक्यात डम्परला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की अपघातात बसचा चुराडा झाला आहे. सेहरा मऊच्या दक्षिण भागात ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
सेहरा मऊ दक्षिणी इथे बस आणि डम्पर आमनेसामने आले. या धडकेत १२ जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या लोकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर घटनास्थळी पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी पोहोचले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातानंतर दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. अधिका-यांशी चर्चा करून बचावकार्य वेगाने करण्याचे आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.