नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज (दि. २५) राष्ट्रीय शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर केले आहेत. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या यादीनुसार, २०२४ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यावर्षी पोलिस, अग्निशमन सेवा, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतील ११३२ कर्मचा-यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक जम्मू-काश्मीर या राज्यातील एकूण ७२ पोलिस कर्मचा-यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यात महाराष्ट्रातील १८ जणांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने आज (दि. २५) दिली.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची आज (दि. २५) घोषणा केली. यामध्ये २७५ शौर्य पुरस्कारांपैकी जास्तीत जास्त ७२ शौर्य पुरस्कार जम्मू-काश्मीर पोलिस कर्मचा-यांना जाहीर करण्यात आले आहेत. यानंतर छत्तीसगड दुस-या क्रमांकावर आहे, जिथे २६ जवानांना हा सन्मान मिळणार आहे. यानंतर झारखंडमधील २३, महाराष्ट्रातील १८, ओडिशातील १५, दिल्लीतील ८, सीआरपीएफमधील ६५ आणि एसएसबी-सीएपीएफ आणि इतर राज्य-केंद्रशासित प्रदेशातील सेवांमधील २१ जवानांना शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत.
नक्षल प्रभावित भागातील ११९ जणांना शौर्य पुरस्कार
एकूण २७७ शौर्य पुरस्कार प्राप्तकर्त्यांपैकी सर्वाधिक ११९ कर्मचारी नक्षलवाद प्रभावित भागात तैनात आहेत. १३३ जवान जम्मू-काश्मीर भागातील आहेत. त्याचबरोबर इतर क्षेत्रातील २५ जवानांनाही त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे.
१०२ जणांना राष्ट्रपती विशेष सेवा पदक
शौर्य पदकांमध्ये गुणवंत सेवेसाठी ७५३ पदकांपैकी ६६७ पदके पोलिस सेवेसाठी, ३२ अग्निशमन सेवेसाठी, २७ नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी आणि २७ सुधारात्मक सेवेसाठी देण्यात आली आहेत. १०२ राष्ट्रपती पदक विशेष सेवांपैकी ९४ पोलिस सेवेसाठी, चार अग्निशमन सेवेसाठी आणि चार नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी देण्यात आले आहेत.
जोखीम घेत केलेल्या कामगिरीसाठी दिले जातात हे पुरस्कार
सीमा सुरक्षा दलाचे दोन हेड कॉन्स्टेबल दिवंगत सानवाला राम विश्नोई आणि दिवंगत शिशुपाल सिंह यांची यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदकासाठी मरणोत्तर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपतींचे शौर्य पदक आणि शौर्य पदक अनुक्रमे दुर्मिळ शौर्याच्या आधारावर दिले जातात. जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी, संबंधित अधिका-याच्या जबाबदा-या आणि कर्तव्याप्रति केलेल्या कामगिरीसाठी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती आणि शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.