सोलापूर : जबरदस्तीने लग्न करण्यासाठी तिघांनी तरुणीच्या मावशीच्या तोंडावर स्प्रे फवारून तिच्या आईवडिलांदेखत तिचे चारचाकी वाहनातून अपहरण केले. विजापूर रोड परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी त्या तिघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ओंकार पासलकर (रा. कोथरुड, पुणे) व त्याच्या दोन मित्रांचा गुन्हा दाखल झालेल्या संशयितांत समावेश आहे. याप्रकरणी तरुणीच्या आईने (रा. पुणे) फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुटुंबियांसह सोलापुरात
बहिणीकडे आल्या होत्या. ते शहरानजीकच्या एका गावी बहिणीच्या मुलीच्या घरी गेले होते.
तेथून ते रिक्षाने पुन्हा बहिणीच्या सोलापुरातील घरी परतले. तेव्हा तिच्या घरासमोर पुणे पासिंगची एक पांढरी चारचाकी गाडी थांबली होती. त्यातून उतरलेल्या दोघांनी फिर्यादीच्या बहिणीच्या तोंडावर स्प्रे फवारून त्यांच्या मुलीस जबरदस्तीने उचलून गाडीत घातले. गाडीत चालक होता. त्यांनी आरडाओरड केली. तसेच त्यांच्या भावाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ढकलून त्यांच्या मुलीस घेऊन निघून गेले.
संशयित ओंकार हा अनेक दिवसांपासून फिर्यादीच्या मुलीच्या मागे लागला होता. मात्र, तिने त्याला प्रतिसाद दिला नव्हता. तसेच तिने तो मागे लागल्याची कल्पना पालकांना दिली होती. तसेच तो त्यांच्या घरासमोर फिरतानाही आढळला होता. त्याने जबरदस्तीने लग्न करण्यासाठी तिचे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.