झरी : परभणी तालुक्यातील झरी ग्रा. पं. चे माजी सरपंच तथा माजी जि. प. सदस्य गजानन देशमुख यांचे गुरुवार, दि.२५ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास निधन झाले. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती. त्यांच्या निधनाची माहिती कळताच गावावर शोककळा पसरली.
झरी सारख्या ग्रामीण भागातून गजानन देशमुख यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. सन २००५ मध्ये प्रथम झरी ग्रा.पं.च्या सरपंचपदी गजानन देशमुख यांची निवड झाली होती. तसेच २०१२ व २०१७ मध्ये जि.प. सदस्य म्हणून निवडून आले. झरी व पंचक्रोशित गजुभाऊ या टोपण नावाने ओळखले जायचे. सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर होते.
विशेष म्हणजे २४ तास लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहत. अनेक गोरगरीबांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहकार्य करणे, भांडण तंटे मिटविणे, गावाच्या विकासाचे प्रश्न शासन दरबारी मांडणे, ग्रामस्थांना मुलभूत व नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यामुळे झरी ग्रामस्थांच्या मनात त्यांची वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती. ऐन उमेदीच्या काळात काळाने त्यांच्यावर झडप मारली. २५ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. व्यापा-यांनी सकाळी बाजारपेठ बंद ठेवली. खाजगी शाळा, जि. प. शाळा स्वयंस्फूतीर्ने बंद ठेवण्यात आली होती.
त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, भावजय, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून झरी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.