नवी दिल्ली : भारत यंदा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. त्यामुळे, यंदा हा प्रजासत्ताक दिन आठवडाभर साजरा करण्याचे नियोजन भारत सरकारने केले आहे. २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून याची सुरूवात करण्यात आली आहे.
त्यानंतर, ३० जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त आदरांजली अर्पण करून हा आठवडा समाप्त करण्यात येईल. आठवडाभर चालणा-या या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावरील परेड ही महिलांवर केंद्रित असणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची थीम ही विकसित भारत आणि भारत-लोकतंत्राची मातृका अशी असणार आहे. यंदाच्या परेडची सुरूवात ही १०० महिला कलाकारांतर्फे करण्यात येणार असून या महिला ढोल, शंख, नगाडे आणि इतर पारंपारिक वाद्ये वाजवणार आहेत. या परेडमध्ये ‘वंदे भारत’ चे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये देशातील विविध राज्यांतील सुमारे १५०० महिला त्यांच्या पारंपारिक पोशाखामध्ये नृत्याविष्कार सादर करतील. यामध्ये लोकनृत्याव्यतिरिक्त शास्त्रीय नृत्य, मुखवटा, कठपुतली नृत्य आणि बॉलिवूड डान्सपर्यंतची झलक पहायला मिळेल.
परेडमध्ये महिला शक्तीचे दर्शन घडणार
यंदाचा प्रजासत्ताक दिन हा महिला सक्षमीकरणावर आधारित आहे. या वर्षी पहिल्यांदाच कर्तव्य पथावर भारतीय लष्कराची आर्टिलरी महिला ऑफिसर देखील नेतृत्व करताना दिसणार आहे. या व्यतिरिक्त ‘मिडियम रेंज सर्फेस टू एयर मिसाईल’ देखील परेडमध्ये सहभागी होणार आहे.
पहिल्यांदाच तीन्ही दलाच्या महिला तुकड्या
विशेष म्हणजे या वर्षी पहिल्यांदाच लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्यदलांमधील महिलांच्या तुकडया संचलन करणार आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या म्हणजेच सीएपीएफच्या मार्चिंगच्या पथकात केवळ महिलाच असतील. या लष्करी दलात सीएमपी, नौदल आणि हवाई दलातील अग्निवीर महिलांचा ही समावेश असेल. या व्यतिरिक्त यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला हवाई दलाच्या चित्ररथामध्ये सुखोई-३० फायटर जेटच्या दोन महिला लेफ्टनंट अनन्या शर्मा आणि फ्लाईंग ऑफिसर आसमा शेख सहभागी होणार आहेत.
बँडचे नेतृत्वही महिलांकडे
या वर्षी दिल्ली पोलिसांच्या बँडचे नेतृत्व महिला कॉन्स्टेबल रूयागानुओ केन्से करणार आहेत. या बँडमध्ये एकूण १३५ कॉन्स्टेबल आहेत. मागील वर्षी या बँडचे नेतृत्व हे पुरूष अधिका-यांकडे होते. मात्र, यावेळी महिला या बँडचे प्रतिनिधित्व करणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची खास तयारी पाहण्यासाठी तब्बल १३ हजारांहून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.