सोलापूर : विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सोलापुरातील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेला तरुण माजी आमदाराचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीत आरोपीने डोक्याला पिस्टल लावून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
याप्रकरणी विराज रविकांत पाटील (वय 35, रा. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) याच्याविरुद्ध पुण्यातील विमाननगर पोलीस ठाण्यात बलात्कार, तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वर्षीय पीडित तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरुन विराज रविकांत पाटील याच्यावर आयपीसी 376, 376(2)(एन), 377, 323, 504, 506, सह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार 27 ऑगस्ट 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत विमाननगर व मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मॉडेलिंग करते. तिने मराठी चित्रपटात काम केले आहे. अद्याप चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. सोशल मीडियातून तिची विराज पाटीलशी ओळख झाली होती. दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन विवाह करणार असल्याचे आमिष विराजने अभिनेत्रीला दिले होते. मात्र त्यानंतर त्याने लग्नाबाबत विचारले असता तरुणीला धमकावले.
आरोपी विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दिले होते. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपी पीडित तरुणीला टाळू लागला. त्यामुळे फिर्यादी तरुणीने विराजकडे याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. मला घरच्यांना का भेटवत नाही अशी विचारणा तरुणीने विराजला केली होती. त्यावर विराज पाटीलने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर जवळ असलेली पिस्टल तरुणीच्या डोक्याला लावून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, तू जर पोलिसांकडे गेली तर तुला दाखवतो मी कोण आहे, अशी धमकी दिल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, आरोपी विराज पाटील याची राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. माजी आमदार रविकांत पाटील यांचा विराज हा पुत्र आहे. रविकांत पाटील हे कर्नाटकमधील इंडी मतदार संघाचे माजी आमदार आहेत. तसेच सोलापूरातून त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती.