माले : मालदीवच्या संसदेत रविवार दि. २८ जानेवारी रोजी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. संसदेतील या राड्यामुळे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू मंत्रिमंडळाच्या प्रस्तावावर होत असलेले मतदान स्थगित झाले.
अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी बोलावलेल्या विशेष सत्रादरम्यान ही हाणामारी झाली. वृत्तानुसार, पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) आणि मालदीवच्या प्रोग्रेसिव्ह पार्टीचे(पीपीएम) या पक्षाच्या सत्ताधारी खासदारांनी माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या नेतृत्वाखालील मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीच्या (एमडीपी) खासदारांना विरोध केला.
दरम्यान, अधाधू या वृत्तवाहिनीने या घटनेचा व्हीडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये एमडीपीचे खासदार इसा आणि पीएनसीचे खासदार अब्दुल्ला शाहीम अब्दुल हकीम भांडताना दिसत आहेत. व्हीडीओ फुटेजनुसार, शाहीम यांनी इसा यांचा पाय पकडला, त्यामुळे ते जमिनीवर पडले आणि त्यानंतर इसाने शाहीमच्या मानेवर लाथ मारली आणि त्याचे केस ओढले.