नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघांनी जिंकला आहे. या सामन्यात टीम इंडियाला २८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान पहिल्या सामन्यात संघाचा नसलेला एक स्टार खेळाडू इंग्लंडच्या संघात सामील झाला आहे.
इंग्लंडचा युवा खेळाडू शोएब बशीर मालिका सुरू होण्यापूर्वी संघासोबत भारतात आला नव्हता. कारण त्याला भारताचा व्हिसा मिळाला नव्हता. त्यामुळे तो इंग्लंडला परतला. आणि पहिल्या कसोटी सामन्याचा भाग होऊ शकला नाही. मात्र, नुकताच शोएब बशीरला भारताचा व्हिसा मिळाला असून तो आता इंग्लंड संघात सामील झाला आहे.
२० वर्षीय क्रिकेटर शोएब बशीर काउंटी क्रिकेट क्लब सॉमरसेटकडून खेळतो. त्याने अद्याप इंग्लंडकडून एकही सामना खेळलेला नाही. शोएब बशीरचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असला तरी त्याचे आई-वडील पाकिस्तानी आहेत.
शोएब बशीरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली असून मालिकेच्या पुढील सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळू शकते, असे मानले जात आहे. मालिकेतील दुसरा सामना २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम येथे खेळला जाईल.