नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने रिक्त जागांबाबत जारी केलेल्या मसुद्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. आता, काँग्रेस खासदार राहुल गांधींनी देखील युजीसीच्या प्रस्तावावर टीका केली. रिक्त जागांबाबत युजीसीने दिलेला प्रस्ताव हा उच्च शिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी या प्रवर्गाला मिळत असलेले आरक्षण संपवण्याचा कट असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
भारत जोडो न्याय यात्रेवर असलेल्या राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर युजीसीच्या प्रस्तावावर टीका केली आहे. यूजीसीच्या नव्या मसुद्यात उच्च शिक्षण संस्थांमधील एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गांना दिलेले आरक्षण संपविण्याचा डाव असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी म्हटले की, ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये अंदाजे ७००० आरक्षित पदांपैकी ३००० जागा रिक्त आहेत आणि त्यापैकी फक्त ७.१ टक्के अनुसूचित जाती, १.६ टक्के आदिवासी आणि ४.५ टक्के इतर मागास घटकांतील प्राध्यापक आहेत.
भाजपचा हा डाव काँग्रेस कधीही यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही सामाजिक न्यायासाठी लढा देत राहू आणि ही रिक्त पदे आरक्षित प्रवर्गातील पात्र उमेदवारांनीच भरू असा निर्धारही राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
युजीसीच्या प्रस्तावात काय म्हटले?
उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जाती (एससी) किंवा अनुसूचित जमाती) किंवा इतर मागासवर्गासाठी (ओबीसी) राखीव असलेल्या रिक्त पदांच्या बाबतीत, या तीन राखीव प्रवर्गाव्यतिरिक्त इतर श्रेणींमध्ये आवश्यकतेनुसार ती भरली जातील. मात्र, राखीव जागांवर योग्य उमेदवार न मिळाल्यास त्या जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जातील असे युजीसीने मसुद्यात म्हटले होते.