18.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeराष्ट्रीयम्हणून थाळ्या वाजवायला लावल्या!

म्हणून थाळ्या वाजवायला लावल्या!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांशी परीक्षेबाबत चर्चा केली. दिल्लीतील भारत मंडपम येथे हा कार्यक्रम झाला. देशभरातील विद्यार्थ्यांनीही व्हर्च्युअल माध्यमातून या चर्चेत सामील होऊन पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले. आपल्या समस्या सांगितल्या. त्यानंतर मोदींनी मुलांना विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले की, तुम्हाला परीक्षा वॉरियर बनायचे आहे, परीक्षा वरियर नाही. तसेच पंतप्रधानांनी भारताच्या कोरोना विरुद्धच्या युद्धाचे उदाहरण दिले आणि कठीण प्रसंगांना धैर्याने कसे तोंड द्यायचे हे देखील सांगितले.

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात मुलांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या काळात लोकांना थाळ्या वाजवायला का सांगितले होते?, कोरोना वॉरियर्सच्या नावाने दिवे लावायला का सांगितले? याबाबत खुलासाही केला आहे. २०२० मध्ये कोरोनाच्या काळात लोकांना थाळ्या वाजवण्यास सांगण्यात आले होते. यामागचे कारण आता ४ वर्षांनंतर समोर आले आहे. नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, थाळ्या वाजवल्याने किंवा दिवा लावल्याने कोरोनापासून दिलासा मिळत नाही, हे मला माहीत आहे. यामुळे कोरोनाचा आजार बरा होत नाही. पण कोरोनाविरुद्धच्या युद्धात देशातील जनतेला एकत्र आणण्यासाठी हे केले. जेव्हा संपूर्ण देशातील लोक एकाच वेळी थाळी वाजवतात आणि एकाच वेळी दिवे लावतात तेव्हा एकतेची अनुभूती मिळते. आपण एकटे कोरोनाशी लढत नसून संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत आहे. सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला तरच अडचणीतून बाहेर पडता येईल.

कोरोना ही जागतिक महामारी आहे. यामुळे सर्व जग त्रस्त झाले होते. मी काय करू शकतो? असे मी देखील म्हणू शकलो असतो. पण मी तसे केले नाही. मला वाटले मी एकटा नाही. देशात १४० कोटी लोक आहेत. सर्वांनी एकत्र येऊन या समस्येला तोंड दिल्यास या समस्येवर मात करू. म्हणूनच मी टीव्हीवर येत राहिलो. लोकांशी बोलत राहिलो. त्यामुळेच परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही कधीही घाबरू नका, आपल्याला त्याचा सामना करावा लागेल आणि विजयी व्हावे लागेल असे पंतप्रधान मोदींनी मुलांना सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR