छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्याकरिता जरांगे पाटील यांनी २ जानेवारीपर्यंत मुदत दिली असल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र, आज मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २ जानेवारी नव्हे, तर २४ डिसेंबरचीच मुदत दिली आहे, असे स्पष्ट केले. त्यामुळे राज्य सरकारला मिळालेल्या मुदतीचा संभ्रम दूर झाला आहे. दरम्यान, राज्य सरकार २४ डिसेंबरच्या आत त्यांचे काम करेल, याबद्दल सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही गुलाल उधळायला तयार आहोत, असे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चांगलीच ढासळली होती. त्यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. सरकारला वेळ दिल्यास मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळेल, असा विश्वास व्यक्त केल्याने जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली. परंतु राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत मुदत मागितली.
त्यावरून २ जानेवारीपर्यंतच मुदत मिळाल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत होता. त्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, आज खुद्द जरांगे पाटील यांनीच राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतच मुदत दिली असल्याचे म्हटले. सरकारनेदेखील या वेळेआधीच मराठा आरक्षण देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आम्ही आता गुलाल उधळायला तयार आहोत, असेही जरांगे म्हणाले.
२४ तारखेच्या आतच समाजाचे कल्याण होईल
जेव्हा बच्चूभाऊ, धोंदे, चिवटे आणि मी बसलो, तेव्हा मी २४ तारीखच दिली होती. त्यानंतर मंत्र्यांचे शिष्टमंडळ आले. गोंघाट झाला. ते म्हणाले २ जानेवारी ही तारीख द्या. मी म्हणालो, २४ तारीखच मिळणार. त्यामुळे राज्य सरकारला २४ तारीखच देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या तारखेच्या आतच समाजाचे कल्याण होईल, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे आम्हाला सरसकट आरक्षण पाहिजे, अर्धवट घेणार नाही. मी सरकारच्या बाजूचा नाही, तर जातीच्या बाजूचा आहे, असेही जरांगे म्हणाले.
जरांगेंना दिला जीआर
आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचले आहे. संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्यासह सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचले. सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली गेली. राज्य सरकारने काढलेला जीआर मनोज जरांगे यांना यावेळी देण्यात आला आहेत.
सोळंकेंनीही घेतली भेट
उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या भेटीसाठी आमदार प्रकाश सोळंके शनिवारी सायंकाळी रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जरांगे पाटलांबद्दल केलेल्या विधानाबद्दल चूक कबूल केली.