माले : भारताशी पंगा घेणे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांना चागलेच महागात पडताना दिसत आहे. मालदीवचा सर्वात मोठा विरोधी पक्ष एमडीपी संसदेमध्ये मुइज्जूंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. यानंतर त्यांच्या विरोधात महाभियोगाची प्रक्रियाही सुरू होईल. महत्त्वाचे म्हणजे, माजी राष्ट्रपती सोलिह यांचा पक्ष असलेल्या एमडीपीकला संसदेत बहुमत आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद मुइज्जू यांच्या खुर्चीवर संकट येताना दिसत आहे.
तसेच, चीन दौ-यावरून परतल्यानंतर मुइज्जू यांना भारतावर अप्रत्यक्षपणे शाब्दिक हल्ला केल्याबद्दल नवी दिल्लीची माफी मागावी लागेल असे मालदीवचे बिझनेस टायकून आणि जूमहूरे पार्टीचे नेते कासिम इब्राहिम यांनी म्हटले आहे. चीनवरून परतल्यानंतर, मालदीव कुण्या खास देशाचा बॅकयार्ड नाही आणि कुठल्याही देशाला त्याला धमकावू दिले जाणार नाही, असे मुइज्जू यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली होती आणि मालदीवच्या विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार हल्ला केला होता. मालदीवचे खासदार कासिम म्हणाले, मी मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांना त्यांच्या विधानाबद्दल भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औपचारिक माफी मागावी, अशी विनंती करेन. कासिम म्हणाले, मुइज्जू यांनी भावनेच्या भरात हे भारत विरोधी भाष्य केले आहे.
कासिम म्हणाले, माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी मालदीवमधील लोक आणि भारतातील लोकांमध्ये अशांतता अथवा मतभेद निर्माण व्हावेत, यासाठी इंडिया आऊट मोहीम सुरू केली होती. माजी राष्ट्रपती सोलिह यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि त्यांना इंडिया आऊट मोहीम चालवू दिली. मात्र, हे कँपेन वाढल्यानंतर त्यावर बंदी घालण्यात आली. तसेच, आपण मालदीवचे भारतावरील अवलंबित्व कमी करू. भारतातील लो क्वालिटीच्या औषधांऐवजी युरोप आणि अमेरिकेहून मागवू असेही मुइज्जू यांनी म्हटले होते. यावर कासिम म्हणाले, मेडिसीनच्या बाबतीत भारत बराच पुढे आहे आणि युरोपही अनेक औषधे भारताकडून आयात करतो.