लातूर : प्रतिनिधी
केंद्रातील भाजप सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरले असल्यामुळे देशातील जनतेमध्ये या सरकारबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी सत्ताधारी मंडळी काँग्रेस आणि इंडीया आघाडीला घाबरले असून विरोधकांना अनेक मार्गांनी कमजोर करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवून अधिक जोमाने कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहे.
आगामी लोकसभा व इतर निवडणूकीच्या पुर्वतयारीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात विभागीय पातळीवर बैठका घेण्यात येत आहेत. राज्यातील सहावी बैठक सोमवारी २९ जानेवारी रोजी लातूर येथील हॉटेल ग्रॅट सरोवर येथे मराठवाडा विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला मार्गदर्शन करीत होते. या बैठकीस काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, पक्षाचे वरीष्ठ नेते संपतकूमार, काँग्रेस नेत्या खासदार रजनीताई पाटील, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी मंत्री तथा मराठवाडा विभागीय बैठकीचे समन्वयक अनिल पटेल, सुरेश वरपूडकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे, अमर राजूरकर, नसीम खान, सेवादलचे प्रदेशाध्यक्ष विलास आवताडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी डॉ. जितेंद्र देहाडे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख,आमदार डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, आमदार मोहनअण्णा हांबरडे, आमदार अमर राजूरकर, आमदार जितेश अंतापुरकर, अशोक पाटील, उल्हासदादा पवार, राजेश राठोड, वजाहत मिर्झा,
महीला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्यासह मान्यवर नेते उपस्थित होते.
यावेळी पूढे बोलतांना प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, देशात प्रचंड वाढलेली महागाई, बेरोजगारी यामुळे देशातील सामान्य जनता अडचणीत आली आहे. नोटबंदी जीएसटी यामुळे व्यापार, उद्योग, डबघाईला आला आहे. सर्वच घटक सरकारवर नाराज आहेत या परिस्थितीत निवडणूका जिंकण्यासाठी सत्ताधारी मंडळी जाती जातीत भांडणे लावत आहेत. धार्मिक वातावरण निर्माण करुन जनतेची दिशाभूल करीत आहेत. या वातावरणात जनतेला सत्य परिस्थितीती समजून सांगण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला देशभरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन घाबरलेली सत्ताधारी मंडळी काँग्रेस आणि इंडीया आघाडीला कमजोर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट कायम राखणे गरजेचे आहे. सत्ताधारी मंडळीकडून होणा-या चुका जनतेच्या लक्षात आणण्यासाठी या कार्यकर्त्यांनी सतत कार्यरत राहणे आवश्यक आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाची बुथ यंत्रणा मजबूत करावी लागणार आहे. इंडीया आघाडीतील प्रत्येक उमेदवार काँग्रेस पक्षाचाच आहे, असे समजून सर्वांनी काम करावयाचे आहे, असे आवाहनही प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केले. माझी प्रभारी म्हणून नियुक्त्ती झाल्यानंतर १५ दिवसांत राज्यात विभाग पातळीवरील आजच्यासह ६ बैठका घेतल्या यामूळे संघटनेत चैतन्य संचारले आहे. नेते, कार्यकर्त्यांमध्ये एकीची भावना दृढ झाली आहे. यातून राज्यात पक्षाला पूर्ववैभव प्राप्त होईल असा मला विश्वास आहे.
लातूर जिल्ह्याचा डीजीटल अहवाल
या बैठकीच्या प्रारंभी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी लातूर शहर व जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने राबवलेल्या सामाजिक कार्याचा तसेच केंद्र व राज्यसरकार विरोधात केलेल्या आंदोलनाचा डीजीटल पध्दतीने अहवाल सादर केला. बुथ व ग्राम कमिट्यांपासून काँग्रेस पक्षाने निर्माण केलेल्या विविध सेलची व त्यामार्फत राबवलेल्या उपक्रमाची माहीती यावेळी सादर केली. या मांडणीचे मान्यवर नेत्यांनी कौतूक केले. या विभागीय बैठकीत नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव नागेलेकर, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजी देसाई, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपूडकर, परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नदीम इनामदार, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युसुफ शेख, जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहमूद यांनी आपआपल्या जिल्ह्याचा अहवाल सादर केला.
याप्रसंगी ओम पाटील, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर सचिव अभय साळुंखे माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, सचिव गोरोबा लोखंडे, सरचिटणीस अमर खानापुरे, सरचिटणीस मोइज शेख, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा विद्या पाटील, सरचिटणीस सपना किसवे, माजी महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, व्यंकटेश पूरी, प्रविण सुर्यवंशी, मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाचे माजी खासदार माजी आमदार सर्व जिल्हाध्यक्ष सर्व शहराध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष फ्रंटल सेलचे सर्व अध्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आजी-माजी पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचलन प्रा. ओमप्रकाश झुरळे यांनी केले तर शेवटी आभार लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी मानले.
विलासरावजीच बोलत आहेत
लातूरचे सुपूत्र विलासरावजी देशमुख देशातले लोकप्रिय नेते होते. त्यांच्या सानीध्यात राहण्याचे सौभग्य मला लाभलेले आहे. आज त्यांच्या गावात येतांना मनस्वी आनंद झाला आहे, असे रमेश चेन्नीथला यांनी म्हटले. त्यांचे सुपूत्र माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि आमदार धीरज देशमुख हे त्यांचा वारसा समर्थपणे पूढे नेत आहेत. कार्यक्रमात अमित देशमुख बोलत असतांना व्यासपीठावरील उल्हासदादा पवार म्हणाले की, ते विलासरावासारखे बोलत आहेत. परंतु मी म्हणालो विलासरावजी सारखे नव्हे सद्या विलासरावजीच बोलत आहेत. यावर उपस्थितांमधून टाळयांचा कडकडाट झाला.
लातूर काँग्रेसमध्ये कौंटूबिक स्नेहभाव-अमित देशमुख
प्रारंभी माजी मंत्री अमित देशमुख यांनी प्रस्तावीक करुन सर्व मान्यवर नेते तसेच मराठवाड्यातील नेते कार्यकर्ते या सर्वांचे यतोचीत स्वागत केले. लातूर काँग्रेस पक्षाचे घर आहे. येथील सर्व नेते, कार्यकर्त्यांमध्ये कौटूबिक नात्याप्रमाणे स्नेहभाव होता आणि पूढेही तो राहणार आहे. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांना तर आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांनी आदरणीय विलासराव देशमुख यांना राजकारणात पूढे जाण्याची संधी उपलब्ध करुन दिली. सहका-याला राजकारणात पूढे घेऊन जाण्याचे लातूर हे दुर्मीळ उदाहरण असेल आणि या लातूरसाठी आदरणीय शंकरराव चव्हाण यांचे कायम मार्गदर्शन लाभले. त्यामूळेच लातूरकर नांदेडला गुरुगृह संबोधत आले आहेत, असेही आमदार अमित देशमुख यांनी म्हटले तेव्हा सभागृहात कृतज्ञतेची भावना निर्माण झाली.
कार्यकर्त्यांनी जिंकण्याची जिद्द बाळगावी
राज्यात सद्या खोके सरकार असल्याची जनतेमध्ये भावना आहे. जनतेमध्ये ही भावना दृढ करण्यासाठी विदयमान सरकारच्या भृष्टाचाराची प्रकरणे काँग्रेस कार्यकर्त्यांनी चव्हाट्यावर आणावीत. या माध्यमातून येणा-या सर्व निवडणूका कार्यर्त्यांनी जिंकण्याची जिद्द बाळगावी, असे आवाहन माजी मंत्री विधासभेतील काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलतांना केले. या प्रसंगी माजी मंत्री नसीम खान, खासदार रजनीताई पाटील यांनी विचार व्यक्त केले.
अपयशी ठरलेली भाजपा धार्मिक आधार घेतेय
सर्व पातळीवर अयशस्वी ठरल्यानंतर धार्मिक आणि जातीय राजकारणाचा आधार घेऊन भाजपा पून्हा एकदा निवडणूकीला सामोरे जाऊ पाहत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्पष्ट भुमिका घेऊन भाजपचा हा डाव उधळून लावावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. राममंदीर न्यायालयाच्या निर्णयानंतर बांधले आहे. त्यांचे भांडवल भाजपने करण्याचे कारण नाही. राम आमचाही आहे, असे ठणकावून सांगून भाजपच्या श्रेय लाटण्याचा कार्यक्रम उधळून लावावा. मराठा समाजाला सर्वप्रथम आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. या विषयातही राजकारण करण्याचा भाजपचा प्रयत्न हानून पाडावा. या संदर्भात न डगमगता काँग्रेस कार्यर्त्यांनी स्पष्ट भुमिका घ्यावी असेही त्यांनी म्हटले.
गुरुच्या भुमीतून महाराष्ट्र जिंकण्याची प्रेरणा घेऊन जाणार-नानाभाऊ पटोले
मराठवाडा संताची भुमी आहेच परंतू त्या सोबत ही भुमी नेतृत्व घडविणारीही असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी बोलतांना म्हटले. मी ज्यांना पाहून राजकारण आणि समाजकारण शिकलो त्या आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या जन्मभुमित मी आज आलो आहे. येथून जातांना महाराष्ट्र जिंकण्याची प्रेरणा घेऊन जाणार असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातही शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या आत्महत्येसाठी भारतीय जनता पक्ष कारणीभूत असून या पापाची शिक्षा त्यांना दिल्या शिवाय काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.