बार्शी : ग्रामसंघाच्या बचत गटातील सदस्यांना वैयक्तिक कर्ज घेण्याची तरतूद नसतानादेखील विविध गावांतील ग्रामसंघाच्या महिला सदस्यांनी वैयक्तिक कर्ज उचलून शासनाची १८ लाख १२ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी १६ महिलांवर बार्शी तालुका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान घडली. याबाबत तालुका अभियान व्यवस्थापक गणेश काकासाहेब पाटील (वय ३४, रा. पानगाव) यांनी बार्शी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाअंतर्गत बचत गटांना कर्जपुरवठा करून शासकीय योजनांचा लाभ देऊन महिला सक्षमीकरणाचे काम केले जाते. खेडेगावातील स्वयंसहायता समूहांना कर्ज वाटप करण्यात येते. यात वरील कालावधीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानाअंतर्गत बार्शी तालुक्यातील उंडेगाव, देवगाव, गाताचीवाडी, लक्ष्याचीवाडी, नागोबाचीवाडी, शेलगाव व्हळे या गावातील ग्राम बचत गटाच्या महिलांनी वैयक्तिक कर्ज घेण्याची तरतूद नसताना त्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून शासनाची १८ लाख १२ हजार रुपये रक्कम उचलली.
संबंधितांनी नोटीस पाठवून तोंडी सूचना देऊन ही कर्ज परतफेड केली नाही.ग्रामसंघाच्या महिला सदस्य सविता गिरी, सुरेखा कुन्हाडे, जयश्री चौघुले, सुनीता जगताप, संगीता गिरी (रा. सर्व उडेगाव), वंदना चव्हाण, संगीता मस्तुद, राणी कदम, अश्विनी मांजरे, अंजन मस्तुद, अपर्णा मांजरे, अनिता मांजरे (रा. सर्व देवगाव), कुसुम गव्हाणे (रा. गाताचीवाडी), सरस्वती पायघन, मनीषा देवकते व शेलगाव व्हळे येथील अंकुर महिला ग्राम संघ यांचे खात्यावरून (रा. नागोबाचीवाडी), भारती शिंदे (रा. लक्ष्याची वाडी) यांनी कर्ज उचलल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.