लोहारा : प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील तोरंबा (हराळी) येथील एका महिलेचा शेतात खून झाल्याची घटना रविवारी दि. २८ जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला व दोन पुरूषांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहारा तालुक्यातील तोरंबा येथील शिवारात रूपा दुणगे (वय ३५) या महिलेचा गळा आवळुन खून केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. लोहारा पोलीसांनी कसून चौकशी केली असता एका महिलेसह दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीवरून तालुक्यातील तोरंबा येथील रुपा दुणगे वय ३५ ह्या बिभीषण रणखांब यांच्या शेतात कांदे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या पतीला दुपारी जेवण करण्यासाठी घरी येते, असे सांगितले होते. परंतु त्या दुपारी घरी न आल्याने त्यांचे पती दिगंबर दुणगे हे जेवणाचा डबा घेऊन शेतात गेले होते.
त्यावेळी त्यांना तेथे त्यांची पत्नी दिसून आली नाही. तेव्हा त्यांनी पत्नीचा इतरत्र शोध घेतला असता रणखांब यांच्या शेतातील ज्वारीच्या फडात त्यांचा मृतदेह आढळला. रूपा दुणगे यांचा गळा आवळून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती लोहारा पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन रितसर पंचनामा केला. त्यांनी तात्काळ एका महिलेसह, दोन संशयित आरोपीना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.